अद्ययावत अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:19 AM2020-02-29T00:19:07+5:302020-02-29T00:19:13+5:30
शिक्षण विभागासाठी ५२ कोटी; ९० वर्गखोल्या करणार डिजिटल
कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांत प्रत्येकी दोन अशा चार अभ्यासिका चालू करण्याबरोबरच यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र केंद्र उभारण्यात येईल, अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी स्थायी समितीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात दिली आहे. महापालिका शाळांसाठी या अर्थसंकल्पात आयुक्तांनी एकूण ५२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
महापालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एकान्त व शांतता असणारी फारशी ठिकाणे नाहीत. त्यामुळे आपले लक्ष केंद्रित करून ते अभ्यास करू शकत नाही, याकडे लक्ष वेधत सूर्यवंशी यांनी कल्याण आणि डोंबिवलीत प्रत्येकी दोन अशा चार अद्ययावत अभ्यासिका चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पात त्याची घोषणा करताना त्यांनी स्पर्धा परीक्षांसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी एक स्वतंत्र के ंद्र चालविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यात महापालिका क्षेत्रातील यूपीएससी आणि एमपीएससीमार्फत निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या केंद्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. ही केंदे्र आणि अभ्यासिका चालविण्यासाठी होतकरू एनजीओची निवड करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
केडीएमसीच्या शाळा व क्रीडांगणे सुस्थितीत ठेवणे, त्यांची दुरुस्ती, देखभाल व निगा राखणे, शाळेतील शौचालये व मुताºयांची व्यवस्था सुस्थितीत ठेवणे, पाण्याची व्यवस्था करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षक वेतनभत्त्यांसह महसुली खर्चांतर्गत ४९ कोटींची तरतूद केली आहे. नवीन शाळा बांधकाम, पुनर्बांधणी व इतर कामे तसेच इतर शाळा बांधणे आदींसाठी भांडवली खर्चांतर्गत एक कोटी ३४ लाखांची तरतूद आयुक्तांकडून अर्थसंकल्पात केली आहे. महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांतील एक शाळा डिजिटल करण्यासाठी मागील अर्थसंकल्पात तीन कोटींची तरतूद केली होती. त्यातून २०० वर्गखोल्या डिजिटल झाल्या आहेत. उर्वरित ९० वर्गखोल्या पुढील वर्षात डिजिटल करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
‘त्याठिकाणीच केंद्र चालू करावे’
आयुक्तांनी स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. २०१२ मध्ये कल्याण पश्चिमेकडील सहजानंद चौकातील झोजवाला कॉम्प्लेकसमध्ये कै. दिवंगत खासदार प्रकाश परांजपे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यात आले आहे. सध्या ते बंद आहे. आयुक्तांनी तेथे केंद्र उघडून ते पुनरुज्जीवित करावे, अशी प्रतिक्रिया माजी महापौर व विद्यमान नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.