उड्डाणपुलासाठी शीळफाट्याच्या दत्तमंदिराचे होणार स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:40 AM2021-03-19T04:40:35+5:302021-03-19T04:40:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई-पुणे महामार्गावरील अत्यंत गजबजलेल्या जंक्शनपैकी एक असलेल्या मुंब्रा बायपास चौक, शीळफाटा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई-पुणे महामार्गावरील अत्यंत गजबजलेल्या जंक्शनपैकी एक असलेल्या मुंब्रा बायपास चौक, शीळफाटा चौक आणि कल्याणफाटा येथील प्रस्तावित ६० मीटर रस्ता रुंदीकरणासह दोन उड्डाणपूल आणि भुयारीमार्गात ३१ इमारती आणि ४५ शेड्स तोडव्या लागणार आहेत. यात येथील पुरातन दत्तमंदिराचेही स्थलांतर करावे लागणार असून हे मोठे आव्हान ठाणे महापालिकेला पेलावे लागणार आहे.
पुरातन दत्तमंदिर हटवून ते नव्या जागेत हलवावे लागणार असून त्यासाठीची प्रक्रिया ठाणे महापालिकेने सुरू केली आहे. विशेष म्हणजे परिसरातील स्थानिकांसह भाविकांना विश्वासात न घेताच ठाणे महापालिकेने यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केल्याने त्यांच्यात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. यामुळे तो शांत करून रीतसर धार्मिक विधी पूर्ण करून मंदिर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया ठाणे महापालिकेला पूर्ण करावी लागणार आहे.
महापे-शीळफाटा-कल्याण मार्गाच्या ६० मीटर रुंदीकरणासह हे दोन उड्डाणपूल आणि भुयारीमार्गासाठी या ३१ इमारती, ४५ शेड आणि दत्तमंदिरासह परिसरातील महावितरणच्या उच्चदाब वीजवाहिन्या स्थलांतरित तर एमआयडीसीची ३.५ किमीची १८०० मिमी व्यासाची जलवाहिनी दोन मीटर भूमिगत करावी लागणार आहे. या दोन्ही वाहिन्या वनविभागाच्या जागेवर असून त्या स्थलांतरित वा भूमिगत करण्यासाठी वनविभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएला थेट दिल्लीचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे या प्रकल्पाच्या आराखड्यात पुन्हा बदल करावा लागल्याने त्याचा पूर्वीचा २८६ कोटींचा खर्च आता ४१० कोटी एक लाख ९४ हजारांवर गेला आहे. अशातच एमएमआरडीएच्या अहवालानुसार आता ठाणे महापालिकेने शीळफाटा येथील दत्तमंदिर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा प्रकल्प एमएमआरडीएचा असला तरी बांधकामे मात्र ठाणे महापालिकेला तोडावी लागणार आहेत. यामुळे पुनर्वसनाचा ताप ठामपालाच सहन करावा लागत आहे.