पोटच्या मुलीच्या कौमार्याचा तिने केला लाखांमध्ये ‘सौदा’: ठाण्यातील महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 06:13 PM2017-12-18T18:13:03+5:302017-12-18T18:20:29+5:30
स्वत:च्याच मुलीच्या कौमार्याचा एका लाखांमध्ये ‘सौदा’ करणा-या ठाण्यातील निर्दयी मातेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून या मुलीचीही सुटका करण्यात आली आहे.
ठाणे : पोटच्या १३ वर्षीय मुलीच्या कौमार्याचा एक लाखांमध्ये ‘सौदा’ करुन तिला शरीरविक्रयाच्या व्यवसायात ढकलण्याच्या तयारीत असलेल्या एका लालची आणि तितक्याच निर्दयी मातेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. तिला १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
एका बारमध्ये वेटर्सचे काम करणारी ही महिला आपल्याच अल्पवयीन मुलीसाठी गि-हाईकाच्या शोधात असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोरम मॉलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील सार्वजनिक रस्त्यावर या यशोधननगर पाडा क्रमांक दोन येथील ३२ वर्षीय महिलेला दौंडकर यांच्या पथकाने ताब्यात घेऊन तिच्याकडून या मुलीचीही सुटका केली. बारमध्येच कामाला असल्यामुळे याच व्यवसायामध्ये आपल्याला चांगली कमाई होईल, या लालचेपोटी तिने आपल्याच मुलीच्या कौमार्याचा एका बडया असामीला सौदा करण्याचे ठरविले होते. त्यासाठीच ती काही गिºहाईकांशी बोलली. ४० हजारांपासून ५० हजारांपर्यंत काही गि-हाईकांडून तिला संमती मिळाली. पण सौदा पक्का होत नव्हता. ती मात्र एक लाखांमध्येच ‘सौदा’ करण्याच्या निश्चयावर ठाम होती. हीच खबर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. तिच्याकडे एक लाख रुपयांची रोकड घेऊन एक बनावट गि-हाईक पोलिसांनी पाठविले. चांगली आसामी मिळाल्याचा तिचा समज झाल्याने तिने तयारी दर्शविली आणि ती पोलिसांच्या जाळयात अलगद अडकली. घरची गरीब परिस्थिती असल्यामुळे पैशांची अडचण होती. त्यामुळे आपण हा प्रकार केल्याची कबूली तिने पोलिसांना दिली. तिच्या या कृत्यामुळे कारवाई करणारे पथकही अवाक झाले.
............................
नुकताच झाला वाढदिवस
ज्या मुलीच्या कौमार्याचा ‘सौदा’ तिच्याच आईने एक लाखांमध्ये केला. ती मुलगी सध्या सातवीमध्ये शिक्षण घेत असून तिचा १३ डिसेंबर रोजी वाढदिवसही साजरा करण्यात आला होता, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वीही अशा दोन मातांना अटक
यापूर्वी २६ जुलै २०१६ रोजी राबोडीतील ‘स्वागत लॉज’ परिसरात आपल्याच १४ वर्षीय मुलीचा शरीरविक्रयासाठी सौदा करणा-या मातेला अटक झाली होती. त्यानंतर १८ आॅगस्ट २०१६ रोजी वागळे इस्टेट भागातील ‘पप्पू का ढाबा’ येथेही स्वत:च्याच १६ वर्षीय मुलीचा अशाच प्रकारे ‘सौदा’ करणा-या महिलेलाही रविंद्र दौंडकर यांच्या पथकाने अटक केली होती.