डॉनचा झाला बडे, छोटा शकील म्हणजे पाव टकला; गुन्हेगारी जगतातील सांकेतिक भाषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 03:37 AM2017-09-29T03:37:17+5:302017-09-29T03:37:24+5:30
आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला हुलकावणी देण्यासाठी अंडरवर्ल्ड जगतामध्ये वापरल्या जाणा-या सांकेतिक भाषेचा गौप्यस्फोट ठाणे पोलिसांनी केला आहे.
- राजू ओढे ।
ठाणे : आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला हुलकावणी देण्यासाठी अंडरवर्ल्ड जगतामध्ये वापरल्या जाणा-या सांकेतिक भाषेचा गौप्यस्फोट ठाणे पोलिसांनी केला आहे. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून या काळ्या दुनियेमध्ये दाऊद इब्राहिमचा उल्लेख बडे म्हणून तर छोटा शकीलचा पाव टकल्या म्हणून केला जातो.
पोलिसांसह भारतातील इतर सुरक्षा यंत्रणा आणि इंटरपोल कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या हालचालींवर नजर ठेऊन आहे. त्यांच्यापासून वाचण्यासाठी दाऊदने कराचीतील बंगल्यामध्ये अत्याधुनिक साधनांसह तंत्रज्ञांची फौज तैनात आहे. दाऊद किंवा छोटा शकील त्यांच्या हस्तकांशी संपर्क साधण्यासाठी मुख्यत्वे व्हीओआयपी (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) तंत्रज्ञानाचा वापर करतात. या तंत्रज्ञानामुळे कॉल कुठून आला आहे, हे स्पष्ट होत नाही. इत:पर सुरक्षा यंत्रणा या कॉल्सवर लक्ष ठेऊन असतात. कोणत्याही कॉलमध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील, पैसा, शस्त्र किंवा खुनासारख्या कोणत्याही शब्दांचा वापर झाला की यंत्रणेचे कान टवकारले जातात. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी अंडरवर्ल्ड जगतामध्ये यासाठी सांकेतिक शब्दांचा वापर केला जातो. या दुनियेत दाऊद इब्राहिमला बडे, तर छोटा शकीलला पाव टकल्या म्हणतात.
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या तिघांना १९ सप्टेंबर रोजी अटक केली. चौकशीदरम्यान त्यांच्या कार्यपद्धतीपासून इतर इत्थंभूत माहिती काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. एखाद्या व्यापाºयाकडून खंडणी वसूल करताना पोलिसांपासून वाचण्यासाठी कोण-कोणती खबरदारी घेतली जाते, याची माहितीही पोलिसांनी आरोपींकडून घेतली. या चौकशीदरम्यान आरोपींनी अंडरवर्ल्ड जगतामध्ये वापरल्या जाणाºया सांकेतिक भाषेची माहिती पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, या काळ्या धंद्यात गुंतलेली मंडळी एकमेकांशी फोनवर संपर्क साधताना पुरेशी खबरदारी घेतात. बडे से बात हो गई, असे समोरच्या व्यक्तीने सांगितले की, त्याचे दाऊद इब्राहिमशी बोलणे झाल्याचे पलीकडची व्यक्ती समजून घेते. त्यांचे संभाषण मुख्यत्वे हिंदी भाषेतच असते.
धक्का दे के आगे बढो...
टोळीने हेरलेले सावज खंडणी देण्यास तयार होत नसेल तर आधी ‘हाथ लगाव’ अशा सूचना हस्तकांना दिल्या जातात. हाथ लगाव याचा अर्थ त्या सावजाला पुरते घाबरवून सोडा असा होतो. तेवढ्याने काम होत नसेल तर ‘धक्का दे के आगे बढो’ असा आदेश दिला जातो. याचा अर्थ त्या सावजाचा खून करा आणि दुसरे बघा, असा होतो.