दाऊद के आदमी तेरा गेम बजा देंगे... खंडणीसाठी बिल्डरला धमकी, दाऊदसह अनिसवरही गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 10:36 PM2017-10-04T22:36:12+5:302017-10-04T22:36:35+5:30
दाऊदचा भाऊ इक्बाल आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध खंडणीचा तिसरा गुन्हा मंगळवारी ठाणोनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणातील फिर्यादी हा ठाण्यातील भाईंदर येथील बिल्डर आहे.
ठाणे - दाऊदचा भाऊ इक्बाल आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध खंडणीचा तिसरा गुन्हा मंगळवारी ठाणोनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या प्रकरणातील फिर्यादी हा ठाण्यातील भाईंदर येथील बिल्डर आहे. खार येथील एका व्यावसायिकाची गोराई येथे 38 एकर जमीन होती. या जमिनीचा सौदा भाईंदर येथील बिल्डरने केला होता. त्यासाठी बिल्डरने व्यावसायिकास 2 कोटी रुपये अग्रिम दिले होते. खरेदीचा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी जमिनीचे भाव वाढले. त्यामुळे व्यावसायिकाने भाव वाढवून मागितल्याने वाद झाला. जमिनीचा ताबा मिळत नसल्याने बिल्डरने मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, दरम्यानच्या काळात बिल्डरच्या भागिदाराच्या नातेवाईकाने जमिनीचा वाद मिटविण्याकरीता चर्चेसाठी बोलविले. फिर्यादी बिल्डर चर्चेसाठी गेला असता तिथे त्याच्या भागिदाराच्या नातेवाईकासह आणखी तीन अनोळखी इसम होते. दोन दिवसांनी त्यांनी बिल्डरला पुन्हा ठाण्यातील टेंभी नाक्यावरील एका हॉटेलमध्ये भेटीसाठी बोलविले. त्यावेळी त्यापैकी एकाच्या मोबाईल फोनवर इक्बाल कासकरने बिल्डरला धमकावले. दाऊद इब्राहिम आणि अनिस इब्राहिम यांनी ही जागा घेतली असल्याचे सांगून, या व्यवहारातून बाजुला होण्यास कासकरने बिल्डरला बजावले. त्यानंतर कासकरने बिल्डरला भेटीसाठी बोलावून जमिनीची संपूर्ण माहिती त्याच्याकडून घेतली.
2012-13 साली बिल्डरला वेळोवेळी परदेशातून धमकीचे फोन आले.
जुलै 2016 मध्ये फिर्यादी बिल्डर ठाणो न्यायालयात असताना त्याला परदेशातून प्रायव्हेट नंबरवरून फोन आला. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस बोलत त्याने बिल्डरला सांगितले. जमिन मालकास दिलेले 2 कोटी रुपये मी घेतले असून, तुला जिवंत राहायचे असेल या व्यवहारातून बाजुला हो आणि 1 कोटी रुपये इक्बाल कासकरकडे एक आठवडय़ाच्या आत पाठव, असे त्याने बिल्डरला धमकावले. न्यायालयात दाखल केलेला दावा मागे घेतला नाही तर दाऊदची माणसं तुला संपवतील अशी धमकी अनिस इब्राहिमने यावेळी बिल्डरला दिली. बिल्डरने याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार ठाणोनगर पोलिसांनी दाऊद इब्राहिम, अनिस इब्राहिम आणि इक्बाल कासकरसह सहा जणांविरूद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला.