पालिकेच्या आरक्षित भूखंडावर बार?, कारवाईसाठी शिवसेना शाखाप्रमुखाचे एकदिवसीय धरणे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 05:03 PM2017-11-21T17:03:17+5:302017-11-21T17:03:31+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेचे हाटकेश परिसरात उद्यानाचे आरक्षण क्रमांक ३०५ असलेल्या भूखंडावर एका अनधिकृत बांधकाम माफीयाकडून बेकायदेशीरपणे बार व रेस्टॉरन्टचे बांधकाम सुरु आहे.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेचे हाटकेश परिसरात उद्यानाचे आरक्षण क्रमांक ३०५ असलेल्या भूखंडावर एका अनधिकृत बांधकाम माफीयाकडून बेकायदेशीरपणे बार व रेस्टॉरन्टचे बांधकाम सुरु आहे. ही बाब उजेडात आल्याने ते बांधकाम त्वरीत हटवून त्या भूखंडावर नागरी सुविधायुक्त विकासकामे करा. या मागणीसाठी स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालय प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले.
पालिकेची बहुतांशी आरक्षित नागरी सुविधा भूखंडांवर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले असले तरी त्यावरील कारवाई अनेकदा अर्थपूर्ण तडजोडीमुळे गुंडाळली जाते. यामुळे आरक्षणांची जागा तेथील अतिक्रमणांमुळे पूर्णपणे पालिकेच्या ताब्यात येत नसल्याने त्यावरील विकासकामांस मोठा विलंब लागतो. अशाच एका मीरारोड येथील प्रभाग १३ अंतर्गत तसेच प्रभाग समिती ६ अंतर्गत असलेल्या आरक्षण क्रमांक ३०५ हा नागरी सुविधा भुखंड उद्यानासाठी आरक्षित आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेभोवती लोखंडी पत्र्यांचे कुंपण घालण्यात आले आल्याने स्थानिकांनी त्यावर विकासकाम होत असल्याचा अंदाज बांधला. परंतु, सुरु असलेले बांधकाम पुत्रण नामक एका स्थानिक अनधिकृत बांधकाम माफीयामार्फत सुरु असुन तेथे बार व रेस्टॉरन्ट सुरु होणार असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. हा बांधकाम माफीया सत्ताधारी भाजपाचा समर्थक असल्यानेच त्या आरक्षणावरील बेकायदेशीर बांधकामाला प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याची बाब उजेडात येताच त्याची माहिती स्थानिकांनी सेनेचे शाखाप्रमुख महेश शिंदे यांना दिली. हे बांधकाम त्वरीत हटविण्यासाठी शिंदे यांनी तत्कालिन वादग्रस्त प्रभाग अधिकारी अविनाश जाधव यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई न करता त्याला जाधव यांनी अभय दिल्याचा आरोप शिंदे यांनी केला. प्रशासनाच्या या अपादर्शक कारभाराविरोधात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. त्याचे निवेदन त्यांनी उपायुक्त दिपक पुजारी यांना दिले. त्यात त्या नागरी सुविधा भूखंडावरील बेकायदा बारचे बांधकाम त्वरीत हटवून त्यावर स्थानिकांसाठी उद्यान, जॉगर्स पार्क, बालवाडी, आदी लोकाभिमुख विकास करावा, अशी मागणी केली आहे. यावर सध्याचे प्रभाग अधिकारी प्रकाश कुळकर्णी यांनी शिंदे यांना मागील घटना विसरुन यापुढे कार्यवाही केली जाईल, असे प्रशासकीय भाषेतील आश्वासन दिले. परंतु, शिंदे हे बांधकाम हटविण्यावर ठाम राहिले. प्रशासनाने ते बांधकाम एका आठवड्यात न हटविल्यास सेनेकडून ते हटविले जाईल, असा दम प्रशासनाला भरला. आंदोलनात उपविभागप्रमुख राजेंद्र पडवळ, सुनिल पाटील, उपशाखाप्रमुख मंगश मोरे, उदय लाड, शंकर यादव, प्रकाश निवाते, कन्हैया कामत यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिका-यांनी सहभाग घेतला होता.