दि.बा.पाटील नामकरण समितीने घेतली केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट
By नितीन पंडित | Published: September 2, 2022 07:25 PM2022-09-02T19:25:22+5:302022-09-02T19:27:23+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिबांचे नाव विमानतळाला देण्यास मंजुरी दिली असून या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
भिवंडी: भुमिपुत्रांचा आवाज असलेले लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून लवकर मंजूर होण्यासाठी दि.बा.पाटील नामकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची भिवंडीतील राहत्या घरी भेट घेतली व केंद्र सरकारकडून नामकरणाला लवकरात लवकर मंजुरी मिळविण्यासाठी विनंती केली.तर दिबांच्या नावासाठी सर्वप्रथम २०१६ मध्ये लोकसभेत आवाज उठविल्याबद्दल मंत्री पाटील यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिबांचे नाव विमानतळाला देण्यास मंजुरी दिली असून या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेल्यानंतर त्याला लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी पाटील यांनी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा,अशी विनंती दि. बा. पाटील नामकरण समितीचे पदाधिकारी माजी खासदार जगन्नाथ पाटील, रामशेठ ठाकूर, माजी आमदार सुभाष भोईर,दशरथ पाटील, जगदीश गायकवाड, संतोष केणे, दशरथ भगत, राजेश गायकर यांच्यासह समितीतील पदाधिकाऱ्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळ व भाजपाचा दिबांच्या नावाला पाठिंबा आहे. त्यामुळे संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर होऊन विमानतळाला दिबांचे नाव मिळेल, अशी ग्वाही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.