VIDEO: स्वॅब टेस्टिंग सुरू असलेल्या ठिकाणीच ठेवले जाताहेत मृतदेह; कळवा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 04:48 PM2020-05-28T16:48:27+5:302020-05-28T16:51:33+5:30
कोविडच्या तपासणी करण्यात येणार्या ठिकाणीच दोन मृतदेह उघड्यावर
ठाणे: कोरोनाबाधितांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन कोरोनाच्या संक्रमणाला कारणीभूत ठरलेल्या ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. कोविडच्या तपासणी करण्यात येणार्या ठिकाणीच दोन मृतदेह उघड्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
ठाणे महानगर पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सध्या कोविड आणि नॉनकोविड अशा प्रकारात समाविष्ट करण्यात आलेले आहे. या ठिकाणी कमी पैशामध्ये कोविट टेस्ट केली जात असल्याने मोठ्या संख्येने लोक चाचणीसाठी जात असतात. मात्र, ज्या ठिकाणी ही चाचणी करण्यात येत आहे. त्याच ठिकाणी चक्क दोन अज्ञात मृतदेह ठेवण्यात आल्याचा व्हिडीओ प्रसारीत झाला आहे. या दोनपैकी एक मृतदेह हा स्ट्रेचरवर निळ्या प्लास्टिकमध्ये बांधून ठेवण्यात आला असून दुसरा मृतदेह पांढर्या कापडात बांधून चक्क लादीवरच ठेवला असल्याचे सदर व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
स्वॅब टेस्टिंग होत असलेल्या ठिकाणीच ठेवले जाताहेत मृतदेह; कळवा रुग्णालयातला धक्कादायक प्रकार #CoronavirusMaharashtrapic.twitter.com/C0FqtPP3Ry
— Lokmat (@MiLOKMAT) May 28, 2020
एकीकडे मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांसाठीही संहिता आखून दिलेली असताना हे दोन मृतदेह असे उघड्यावर टाकण्याचा प्रताप शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाने केला आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाने हे मृतदेह अज्ञात असून त्यांना कोरोना नसल्याचे सांगितले जात असले तरी मृत्यूनंतर अनेकांच्या टेस्ट पॉझिटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार अनाकलनीय असल्याचे बोलले जात आहे.