रस्त्यात सुरू असलेले भांडण सोडवण्यास गेलेल्या युवकावर प्राणघातक चाकू हल्ला
By नितीन पंडित | Published: March 28, 2023 06:38 PM2023-03-28T18:38:18+5:302023-03-28T18:38:45+5:30
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी - रस्त्यात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या युवकावर प्राणघातक हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी भिवंडीत घडली आहे . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील डुंगे गावातील सिव्हिल इंजिनिअर आदेश वसंत पाटील,वय ३० हा आपला चुलत भाऊ जयंत पाटील यास भिवंडी रेल्वे स्टेशन येथे सोडण्यासाठी आपल्या कार ने दुपारी १२ वाजताच्या सुमारास जात असताना महावीर चौक अंजुर - फाटा येथे दोघा बाईक स्वारांमध्ये बाईकच्या वादातून भांडण सुरू होते. यावेळी आदेश याने हा प्रकार पाहून दोघा जणांनी अडवून ठेवलेल्या बाईक स्वारास सोडून देण्याचे सांगत रेल्वे स्टेशनकडे निघून गेला.
थोड्या वेळाने त्याच मार्गे घरी परतत असताना तेथील दोघा बाईकस्वारांमधील वाद विकोपाला जाऊन दोघा जणांचे अजून दोन साथीदार त्या ठिकाणी येऊन बाईक स्वरास मारहाण करीत होते, यावेळी बाईक ची चावी काढून घेतली होती, यावेळी आदेश याने मध्यस्ती करुन भांडण सोडवण्यासाठी पुढाकार घेत बाईकची चावी हिसकावल्याने त्याचा राग येऊन चौकडी मधील योगेश सपाटे व त्याच्या तीन साथीदारांनी आदेश यास मारहाण करीत एकाने धारदार चाकू आदेशा च्या डाव्या बाजूकडील पोटात व जांघेत खुपसून गंभीर जखमी करून पळून गेले .
या घटने नंतर गंभीर जखमी युवक आदेश यास अंजुरफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले असून नारपोली पोलिसांनी योगेश सपाटे व त्याच्या तीन साथीदारां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्राणघातक चाकू हल्ल्यास चोवीस तास उलटून गेले तरी नारपोली पोलिसांनी एकाही आरोपीस पकडले नसल्याने आदेशच्या परिवाराने नारपोली पोलीस ठाणे येथे एकत्रित होत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी आरोपींना लवकर ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थ महिलांना दिले आहे.
दरम्यान अंजुरफाटा रेल्वे स्टेशन रोड परिसरात नशेखोर गर्दुल्ले यांचा वावर वाढला असून अनेक वेळा मारहाण होण्याच्या घटना घडल्याने या भागात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भिवंडी जिल्हा प्रमुख विश्वास थळे यांनी पोलीस विभागाकडे केली आहे .