आकाशकंदील, पणत्या रंगवून कर्णबधिर मुलांनी साजरी केली दिवाळी

By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 9, 2023 03:25 PM2023-11-09T15:25:58+5:302023-11-09T15:29:06+5:30

सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व यांनी कर्णबधिर मुलांसाठी आयोजित केली कार्यशाळा.

Deaf children celebrated Diwali by painting Akashkandil and Pantai in thane | आकाशकंदील, पणत्या रंगवून कर्णबधिर मुलांनी साजरी केली दिवाळी

आकाशकंदील, पणत्या रंगवून कर्णबधिर मुलांनी साजरी केली दिवाळी

ठाणे: दीपावलीनिमित्त ठाण्यातील कर्णबधिर मुलांनी आकाशकंदील आणि पणती रंगविण्याचा अनुभव घेतला. सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्वने आयोजित केलेल्या कार्यशाळेत या मुलांकडून पारंपारिक आकाशकंदील बनवून घेण्यात आले तसेच, पणत्या रंगवून घेण्यात आल्या. यावर्षी ही सर्व मुले त्यांनी या कार्यशाळेत स्वतः बनवलेले आकाशकंदील आपापल्या घरी लावून दीपावलीचा वेगळा आनंद लुटणार आहेत. 

आपण जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद आपल्याला प्राप्त होत असतो हाच अनुभव या कार्यशाळेत उपस्थित राहिलेल्या मान्यवरांनी घेतला. शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व या सामाजिक संस्थेतर्फे दीपावली आकाशकंदील आणि पणती पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन केले होते.

यावर्षी ठाण्यातील कमलिनी कर्णबधिर शाळा आणि झवेरी ठाणावाला कर्णबधिर शाळेच्या अंदाजे १०० विद्यार्थ्यांसाठी या विशेष कार्यशाळेचे विनामूल्य आयोजन प्रा .श्याम धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या कार्यशाळेतून या विशेष मुलांना त्यांच्या उपजिविकेसाठी आकाशकंदील व्यवसाय म्हणूनही पुढें उपयोगी ठरू शकतो असे धुरी यांनीआपल्या प्रस्तावनेत नमूद केले.मंडळाचे कार्याध्यक्ष गिरीश राजे यांनी " चायनीज किंवा रेडिमेड आकाशकंदीलाच्या या युगात, पारपरिक आकाशकंदील ही संकल्पना पुन्हा नवीन पिढीत पुन्हा रुजावी म्हणून या अशा कार्यशाळेची आज आवश्यकता आहे आणि हेच या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. 


कार्यशाळेच्या समारोपनंतर आपण बनविलेले आकाशकंदील घरी नेताना सर्वच उपस्थित मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अविस्मरणीय होता. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ रांगोळीकार महेश कोळी सर, चित्रकार भगवान दास, संगीतकार विशाल राणे, जाणता राजा या महानाट्यातील कलाकार नितीन आंबवणे, झवेरी ठाणावाला ट्रस्टचे विश्वस्त सिद्धार्थ जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.कमलिनी कर्णबधिर शाळेच्या मुख्याध्यापिका माया कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी केले.

Web Title: Deaf children celebrated Diwali by painting Akashkandil and Pantai in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे