ठाण्यातील फॉरेस्ट कॉलनीतून वनपालाची रिवॉल्व्हर भरदिवसा चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 07:44 PM2018-03-04T19:44:26+5:302018-03-04T19:44:26+5:30
ठाण्यातील कोपरी येथील फॉरेस्ट कॉलनीत वास्तव्याला असलेल्या एका वनपालाची खासगी रिवॉल्व्हर शनिवारी भरदिवसा चोरी झाली.
ठाणे : मुलुंड येथे कार्यरत असलेल्या एका वनपालाची खासगी रिवॉल्व्हर कोपरी येथून शनिवारी भरदिवसा चोरी झाली. कोपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
मुलुंड येथे वन विभागात वनपाल म्हणून कार्यरत असलेले संदीप तुकाराम चौरे (३३) हे कोपरी येथील फॉरेस्ट कॉलनीमध्ये राहतात. टाईप ३ च्या क्वार्टर क्रमांक २ मध्ये चौरे यांचे वास्तव्य असून, शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ते कुटुंबासह दवाखान्यात गेले होते. दुपारी १ वाजून ५0 मिनिटांनी परत आले असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. अज्ञात चोरांनी चौरे यांच्या घराच्या मागील दरवाजाने प्रवेश करून कपाटातील लॉकर तोडले. या लॉकरमधील ८0 हजार रुपये किमतीचे भारतीय बनावटीचे रिवॉल्व्हर आणि ७0 हजार रुपयांची रोकड चोरांनी लंपास केली. चौरे यांच्याकडे या रिवॉल्व्हरचा परवाना असल्याची माहिती कोपरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोपाळ यांनी दिली. चौरे यांच्या घराजवळच असलेल्या आणखी एका खोलीचे काम काही दिवसांपूर्वी सुरू होते. त्यासाठी काही मजूर या कॉलनीमध्ये नियमित यायचे. त्यांनी चौरे यांच्या घरावर लक्ष ठेऊन चोरी केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. कोपरी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी या परिसरात कुठे सीसी कॅमेर्याची व्यवस्था आहे का, याची चौकशी केली. मात्र जवळपासच्या परिसरात तशी व्यवस्था नसल्याचे समजले. त्यामुळे परिसरातील रहिवाशांकडे चौकशी करून तपास करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राम गोपाळ यांनी सांगितले.