ठाण्यात पाण्याच्या डबक्यात पडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यु: सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 08:42 PM2018-02-15T20:42:41+5:302018-02-15T21:22:12+5:30
ढोकाळी येथील पाण्याच्या डबक्यात पडून सतिश शांताराम धोत्रे (१०) या मुलाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी १४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे: बाळकुम येथील हायलंड पार्कयेथे एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीसाठी असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडून सतिश शांताराम धोत्रे (१०) या मुलाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.
‘हायलँड गार्डन’ या बांधकाम व्यावसायिकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम ढोकाळी भागात सुरु आहे. तिथे या बांधकामासाठी खड्डा खोदून पाणी साचविण्यात आले आहे. त्याठिकाणी झरे लागल्यामुळे याठिकाणी मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. याच पाण्यात आंघोळीसाठी १२ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास सतिश धोत्रे (रा. वडारवाडी, बाळकूम, ठाणे) याच्यासह सात ते आठ मुले उतरली. त्यावेळी पाण्यातील दगडामध्ये त्याचा पाय रुतल्याने तो जखमी होऊन तो पाण्यात अडकला. तो अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर जखमी अवस्थेतच त्याला स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी प्राथमिक चौकशीमध्ये या मुलांना पाण्यात जातांना न रोखल्याने तसेच कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून या बांधकामाच्या साईटवरील ‘डेल्टा गार्ड’ या सुरक्षा रक्षक पुरविणा-या कंपनीचा सुरक्षा रक्षक शाहीद अहमद खलील अहमद सिद्धिकी (५०, रा. देवरी पाडा, मुंब्रा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी मुलाचा मृत्यू झाला त्याठिकाणी मोकळी जागा असून त्याठिकाणी शाहिद याची निगराणी ठेवण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. यात त्याने हलगर्जीपणा तसेच कामचुकारपणा केल्याने त्याचा मृत्यु झाल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशी सुरु असल्यामुळे अद्याप त्याला अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी सांगितले.