पंजाब नॅशनल बँकेने वेळेत पैसे न दिल्याने ग्राहकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:35 AM2018-04-19T01:35:00+5:302018-04-19T01:35:00+5:30
त्यांचे पंजाब नॅशनल बँकेत बचत खाते असून त्यात २७ हजार रूपये जमा आहेत.
उल्हासनगर : पंजाब नॅशनल बँकेने वेळेत पैसे न दिल्याने उपचाराअभावी बुधवारी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आणि त्या निषेधार्थ नातेवाईकांनी मृतदेह बँकेत नेत गोंधळ घातला. त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
विठ्ठलवाडी परिसरात गणेश पांडुरंग कांबळे कुटुंबासमवेत राहतात. काही महिन्यांपासून आजारी असलेल्या गणेश यांच्यावर केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. आठ वर्षापूर्वी पत्नी त्यांना सोडून गेली असून एकुलता मुलगा, आई-वडिलांसोबत ते राहत होते. त्यांचे पंजाब नॅशनल बँकेत बचत खाते असून त्यात २७ हजार रूपये जमा आहेत. उपचारासाठी पैशाची गरज असल्याने, त्यांनी बँकेतून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक कारणे दाखवून त्यांना पैसे नाकारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
बचत खात्यात पैसे असूनही ते वेळेत न मिळाल्याने त्यांचा उपचाराविना मृत्यू झाल्याचा ठपका त्यांनी ठेवला. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध होत असून बँकेवर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. नातेवाईकांनी शववाहिनीतून गणेश यांचा मृतदेह बँकेत आणल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर नातेवाईकांची समजूत काढल्यावर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. याबाबत पंजाब नॅशनल बँकेकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. बॅकेतील गोंधळानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनीही बँकेत धाव घेतली होती.