मुख्यमंत्र्यांच्या सभेवेळी शॉक लागल्याने मृत्यू; खासगी रुग्णालयात होता दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 07:31 AM2023-06-09T07:31:21+5:302023-06-09T07:32:51+5:30
खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंब्रा : दिवा शहरातील धर्मवीरनगर येथे बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेत स्टेजच्या डाव्या बाजूला शार्टसर्किट होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रामजियावन विश्वकर्मा (वय ५५) असे त्याचे नाव आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे भाषण सुरू असताना स्टेजच्या डाव्या बाजूला शाॅर्टसर्किट झाले. ही बाब लक्षात येताच शिंदे यांनी शाॅर्टसर्किट झालेल्या ठिकाणचा वीजपुरवठा बंद करण्याचे निर्देश संबधितांना दिले. दुर्घटना घडू नये यासाठी संबंधित ठिकाणचा वीजपुरवा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यावेळी विश्वकर्मा यांना शाॅक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला.
विश्वकर्मा यांचे सभा झालेल्या ठिकाणाजवळ फर्निचरचे दुकान आहे. ते त्याठिकाणी काम करत असताना त्यांना शाॅक लागून त्यांचा मृत्यू झाला. सभेच्या ठिकाणी झालेल्या शाॅर्टसर्किटचा आणि विश्वकर्मा यांचा दुरान्वयेही संबंध नाही, अशी माहिती मुंब्रा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शहाजी शेळके यांनी दिली.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
कार्यक्रमाचे आयोजक माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या दिवा मंडळचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली. तसेच ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनीही आयोजकांवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे उच्च न्यायालय व पोलिस आयुक्तांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.