चुकीच्या उपचारामुळे रूग्णाचा मृत्यू; तीन बोगस डॉक्टरांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 02:34 AM2019-07-05T02:34:38+5:302019-07-05T02:35:00+5:30
डॉ. दाऊद खान याची सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट असून, त्याने या पदव्या भिवंडीतून खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
ठाणे : चुकीच्या उपचारांमुळे डायघर येथील अंकित पाटील याचा मृत्यू झाल्याची घटना २४ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी डॉ. दाऊद खान याला अटक केली असून, आणखी दोन बोगस डॉक्टरांवरही कारवाई केल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी दिली.
डॉ. दाऊद खान याची सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट असून, त्याने या पदव्या भिवंडीतून खरेदी केल्याचे उघड झाले आहे. अंकित (२५) याला पोटदुखीचा त्रास झाल्याने तो शीळफाटा येथील डॉ. खान यांच्या बुरहानी क्लिनिकमध्ये २४ एप्रिल रोजी गेला होता. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने मित्राने त्यास काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. चुकीच्या उपचाराने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करून डॉक्टर खान याच्याविरुद्ध तक्रार केली होती.
बोगस पदवी विकणाऱ्या दोघांना भिवंडीतून अटक
या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने २१ जून २०१९ रोजी आपला अहवालही पोलिसांना दिला. डॉ. खान याच्याकडे बीयूएमएस ही वैद्यकीय पदवी होती. अॅलोपॅथीचे प्रमाणपत्र आणि ज्ञान नसूनही त्याने अंकितला जास्त क्षमतेचे इंजेक्शन दिले. त्याच इंजेक्शनची रिअॅक्शन होऊन अंकितची प्रकृती गंभीर झाली.
ती गंभीर होत असतानाही त्याला त्याने स्वत:च्याच रुग्णालयात उपचार सुरू ठेवले. त्यास पुन्हा दुसरे इंजेक्शन दिल्यानंतर मात्र त्याचा मृत्यू ओढवल्याचे या अहवालात स्पष्ट केले आहे. हा अहवाल मिळताच २४ जून रोजी कथित डॉक्टर खानविरुद्ध डायघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. त्याने त्याची वैद्यकीय पदवी भिवंडीतून अल्प किमतीमध्ये विकत घेतल्याचीही बाब उघड झाली.
त्याला पदवी विकत देणाºया डॉ. महंमद फरहान महंमद शाहिद शेख (३६, रा. मुंब्रा) आणि डॉ. अब्दुल रेहमान खान (३६, रा. भिवंडी) या अन्य दोन डॉक्टरांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सादीक बागवान, पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, उपनिरीक्षक विकास राठोड आणि सागर शिंदे यांनी अटक केली.
बोगस पदव्यांचा वापर करून वैद्यकीय सराव आणि व्यवसाय करणाºया बोगस डॉक्टरांचीही माहिती डॉ. खान याच्या चौकशीतून पुढे आली आहे. त्यांच्याविरूद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.