मनसुख हिरन यांचा पाण्यात बुडून मृत्यु: मृत्युबाबत अनेक तर्कवितर्क

By जितेंद्र कालेकर | Published: March 6, 2021 08:17 PM2021-03-06T20:17:53+5:302021-03-06T20:29:41+5:30

मनसुख हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. हिरेन यांचे पुन्हा शवविच्छेदन करावे, असा आग्रह त्यांच्या कुटुंबीयांनी धरला होता. मात्र सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी कुटुंबाने दर्शवली.

Death of Mansukh Hiran by drowning: Many arguments about death | मनसुख हिरन यांचा पाण्यात बुडून मृत्यु: मृत्युबाबत अनेक तर्कवितर्क

अखेर मृतदेह घेतला ताब्यात

Next
ठळक मुद्दे भावासह मित्रांनी व्यक्त केला हत्येचा संशय!अखेर मृतदेह घेतला ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीपाशी स्फोटके ठेवण्याकरिता ज्या मनसुख हिरेन यांची मोटार वापरण्यात आली, त्या हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद केले आहे. हिरेन यांचे पुन्हा शवविच्छेदन करावे, असा आग्रह त्यांच्या कुटुंबीयांनी धरला होता. मात्र सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी कुटुंबाने दर्शवली. शनिवारी दुसऱ्या दिवशीही त्यांच्या मृत्युबाबत नातेवाईक तसेच मित्रपरिवाराकडून उलटसुलट चर्चा सुुरु होती.
मनसुख यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपास खाडीजवळ चिखलात मिळाला. त्यानंतर एका क्रेनच्या सहाय्याने तो ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बाहेर काढला. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी तो ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालतयात तो शवविच्छेदनासाठी पाठविला. शुक्रवारी रात्री ८ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश घाडगे यांच्या चमूने हे शवविच्छेदन केले. दुसºया दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत कळवा रुग्णालय प्रशासनाने हिरन यांच्या मृत्युचे नेमकी कारण स्पष्ट केले नाही. त्यानंतर हा अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सोपविला. अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीचा विषय असल्यामुळे या अहवालातील बाबी सांगता येणार नसल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, मनसुख यांच्या अंगावर मारहाणीच्या खूणा नसून किरकोळ खरचटल्याच्या खूणा आहेत. या खूणा मृतदेह खाडीतून बाहेर काढतांना झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
* भावासह मित्रांनी व्यक्त केला हत्येचा संशय!
मनसुख यांना मारहाण करुन त्यांचा मृतदेह पाण्यात टाकला गेल्याची शक्यता मनसुख यांचे भाऊ विनोद हिरन यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी ते वास्तव्यास असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील विजय पाम या सोसायटीच्या बाहेर जमा झालेल्या मित्र परिवारानेही त्यांच्या मृत्युबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. सोसायटी तसेच त्यांच्या वंदना सिनेमा गृहासमोरील दृकानाच्या बाहेर आणि कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाबाहेर जमा झालेल्या लोकांमध्येही त्याच्या मृत्युबद्दल घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्याचवेळी पोलीस अधिकारीही अधिकृतरित्या काहीच बोलत नसल्यामुळे पोलिसांवरही या संपूर्ण प्रकरणाचा दबाव असल्याचे स्पष्ट जाणवत होते.
........................................
* सीए चा अहवाल प्रलंबित
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने शवविच्छेदनाचा अहवाल दिला आहे. मात्र, मुंबईच्या कलीना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून रासायनिक विश्लेषणाचा अहवाल राखीव ठेवण्यात आल्यामुळे मृत्युचे नेमके कारण स्पष्ट नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...........................
* अखेर मृतदेह घेतला ताब्यात
इन कॅमेरा पुन्हा शवविच्छेदन केल्यानंतर तसेच मृत्युचा अहवाल आल्यानंतरच मनसुख यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाईल, असा पवित्रा मनसुख कुटूंबियांनी शनिवारी सकाळी घेतला होता. मात्र, मृतदेहाची होणारी हेळसांड आणि तपासात पारदर्शकता ठेवण्याचे आश्वासन ठाणे पोलिसांनी दिल्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुटूंबियांनी अत्यसंस्कारासाठी मृतदेह ताब्यात घेतला.
.............................
* निवासस्थानाला पोलीस छावणीचे स्वरुप-
मनसुख यांच्या विजय पाम या इमारतीच्या बाहेर, छत्रपती शिवाजी रुग्णालयातील न्यायवैद्यक प्रयोगशाळा या सर्व ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे या सर्व ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरुप आले होते.
.......................
* मृत्यु १२ तासांपूर्वी
मनसुख यांचा मृत्यु हा १२ तासांपूर्वी झाल्याचेही पीएम अहवालात म्हटले आहे. सायंकाळी ८ वाजता पीएमसाठी मृतदेह घेण्यात आला. त्याआधी १२ तास म्हणजे तो सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
.............

Web Title: Death of Mansukh Hiran by drowning: Many arguments about death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.