जव्हार येथे कुमारिका मातेचा मृत्यू; परिसरातील सामाजिक समस्या ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 01:08 PM2021-08-18T13:08:38+5:302021-08-18T13:16:00+5:30
Jawhar News : गरोदर मातांकडे आरोग्य व्यवस्थेकडून देण्यात येणारे लक्ष करोना पार्श्वभूमीवर कमी झाले असून ग्रामीण भागातील कुमारीकांच्या प्रसूतीचे प्रमाण अजूनही लक्षणीय आहे.
हुसेन मेमन, जव्हार
देश एकीकडे स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिन साजरा करत असताना जव्हार तालुक्यातील बेहेडपाडा येथील 16 वर्षीय कुमारिका मातेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना घडली असून, जन्मलेले बाळ मृत्यशी झुंज देत आहे. गरोदर मातांकडे आरोग्य व्यवस्थेकडून देण्यात येणारे लक्ष करोना पार्श्वभूमीवर कमी झाले असून ग्रामीण भागातील कुमारीकांच्या प्रसूतीचे प्रमाण अजूनही लक्षणीय आहे. त्याचबरोबरीने गरोदर महिलांना आवश्यक औषध व विषयक देखभाल होत नसल्याने मातामृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
वावर- वांगणी येथील बेहेडपाडा येथे राहणाऱ्या एका 16 वर्षीय कुमारिकेची 15 ऑगस्ट च्या सकाळी तिच्या राहत्या घरी प्रसूती झाली. आपली मुलगी गरोदर असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना अनेक महिने नसल्याची माहिती पुढे आली असून प्रसूतीनंतर मुलीला आकडी येऊ लागल्याने तसेच रक्तदाब वाढल्याने गंभीर अवस्थेत या महिलेला जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे पर्यंत केले मात्र दीड तासाच्या उपचारानंतर तिचे 15 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास निधन झाले. याप्रकरणी जव्हार पोलिसाने पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून गंभीर असलेल्या मुलाचे डीएनए तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत.
करोना काळात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या उपकेंद्रांमधील परिचारिका व आशा सेविकांकडून गरोदर मातांची पाहणी दौरे व तपासणीच्या कामावर परिणाम झाला आहे. अनेकदा ग्रामीण भागातील महिला प्रसूती करिता शहरी भागात आल्या असता त्यांचे गरोदर काळातील माहिती पत्रिका (कार्ड) अपूर्ण असल्याचे तसेच त्यांना गरोदरपणाच्या काळात लोह, कॅल्शियम फॉलिक ऍसिड व इतर ताकदीची औषधे दिली जात नसल्याचे दिसून आले आहे. यैवनात येणाऱ्या तरुण मुलीला लैंगिक व सामाजिक शिक्षण दिले जात नसल्याने जिल्हयातील ग्रामीण भागातील 19 वर्षाखालील प्रसूतीचे प्रमाण 20 टक्क्यांच्या जवळपास पोहोचले आहे.
विवाहापूर्वी गरोदर असल्याचे निदर्शनास आल्यास काही प्रकरणांमध्ये विवाह करण्यात येतो तर काही प्रकरणात परस्परांमध्ये दुरावा होऊन अविवाहित मातांची प्रसूती होण्याचे प्रकार होत आहेत. अल्पवयीन मुलीला संस्कार व लैंगिक शिक्षणाद्वारे माहिती दिली जात नसल्याने कुमारिका माता व अल्पवयात प्रसूती ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील समस्या निर्माण झाली आहे.
जव्हार उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झालेल्या कुमारिका मातेला गंभीर अवस्थमध्ये आणण्यात आले होते. तिचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र काही वेळेतच तिचे निधन झाले. तर बाळाचे वजन 1 किलो 200 ग्राम इतकाच असून हा वजन खूप कमी आहे, बाळाची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे.
- डॉ रामदास मारड, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय जव्हार