टेम्पो दिला नाही म्हणून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू, म्हारळमधील घटना : दोन गटांतील वादामुळे तणाव, परस्परांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 03:08 AM2017-09-08T03:08:02+5:302017-09-08T03:08:45+5:30
गणेश विसर्जनासाठी टेम्पो दिला नाही म्हणून म्हारळ गावातील दोन गटात झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला
कल्याण/बिर्लागेट : गणेश विसर्जनासाठी टेम्पो दिला नाही म्हणून म्हारळ गावातील दोन गटात झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला; तर दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही गटाच्या व्यक्ती परस्परांवर आरोप करत टिटवाळा पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसल्याने रात्री उशिरा दोन्ही गटांवर गुन्हा दाखल झाला. पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे गावात प्रचंड तणाव आहे. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या घटनेबाबत दोन्ही गटांनी वेगवेगळे दावे केल्याने नेमके काय घडले हे उशिरापर्यंत समजत नव्हते. पण प्राथमिक तक्रारीनुसार, म्हारळ गावातील सूर्यानगर परिसरात राहणाºया माया चौधरी यांचा मुलगा सुरेश चौधरी उर्फ गटल्या याला गणपती विसर्जनसाठी टेम्पो हवा होता. याच परिसरात राहणाºया परवेज अकबर शेख याच्याशी त्यावरून त्याचा वाद झाला. परवेज यांच्या भावाच्या ग्रूपनेही यंदा गणपती बसवल्याने त्यांनाही विसर्जनासाठी टेम्पो हवा होता. त्यामुळे त्यांनी सुरेशच्या ग्रूपला टेम्पो दिला नाही. त्यातून बाचाबाची झाली आणि परस्परांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. विसर्जनानंतर बुधवारी रात्री मलखान कम्पाऊंडसमोर सूर्यानगर परिसरात एका मुलाचा वाढदिवस होता. तेथे सुरेश चौधरी आणि परवेज साथीदारांसह आमनेसामने आले. दोघांत पुन्हा बाचाबाची झाली. त्यातून वातावरण तंग झाले. सुरेश चौधरी, स्वप्नील चौधरी, युवराज पांचागे, रवी दंबगे, डोक्या उर्फ पिंट्या, सुभाष भोईर, माया चौधरी, तिची मुलगी जया, त्यांची वहिनी आणि परवेज शेख, त्याचा भाऊ यांच्यात तुफान हाणामारी झाली. शेखसोबत असलेल्यांना फारसा प्रतिकार करता आला नसल्याचा त्यांचा दावा आहे. यात शेखचा धाकटा भाऊ मेहंदी यांच्या डोक्यात रॉडचा जबरदस्त फटका बसल्याने त्याला आधी ममता रूग्णालयात आणि नंतर मुंबईत जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. यावेळी प्रतिकारात मनोज गोस्वामी यालाही मार लागला. त्याच्यावर कळव्याच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या गाडीतून परवेज आला होता, तिचीही तोडफोड करून ती उलटी करण्यात आली, तर मोटारसायकल गटारात फेकण्यात आली.