प्लास्टर कोसळून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 05:15 AM2019-04-06T05:15:26+5:302019-04-06T05:15:49+5:30
चार जण जखमी : भार्इंदरमधील २८ वर्षे जुनी इमारत
मीरा रोड : भार्इंदरमधील २८ वर्षे जुन्या इमारतीतील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर शुक्रवारी पहाटे कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. भार्इंदर पूर्वेच्या गोडदेवनाकयासमोरील एमआय उद्योग भागात साई पुष्पम नावाची तीन मजली इमारत आहे. यात ४४ सदनिका असून त्यातील तब्बल ३१ सदनिकांमध्ये भाडेकरू राहतात. ही इमारत २८ वर्षे जुनी असून बाहेरून ती व्यवस्थित दिसत असली, तरी आतील बांधकाम मात्र कमकुवत असल्याने जानेवारी महिन्यातच गृहनिर्माण संस्थेने सर्व सदनिकाधारकांना अंतर्गत दुरुस्ती करून घेण्याबद्दल लेखी पत्र दिले होते. काहींनी दुरुस्तीचे काम सुरू केले, तर बहुतांश रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सी ३०९ ही सदनिका मूळ मालक मनोज झिलका यांनी सुमारे वर्षभरापूर्वी खान कुटुंबीयांना भाड्याने दिली होती. परंतु, सदनिकेत मात्र अनेक जण राहत होते. शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमारास सर्व झोपेत असताना अचानक छताचे प्लास्टर कोसळले. यात मोहम्मद खालीब खान (४५), मुकीम खान (४०), मोहम्मद नफीस खान (३९), मोहम्मद हारूल खान (३०), आशिया बेगम (२८) हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अग्निशमन दल, नवघर पोलीस घटनास्थळी गेले.
जखमींना आधी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमींपैकी मुकीम खान याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित आदींनी इमारतीची पाहणी केली. पालिकेने तातडीने इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सुरू केले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर इमारत रिकामी करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.
घराच्या दुरुस्तीकडे केले दुर्लक्ष
गृहनिर्माण संस्थेचे सचिव शंकर गायकवाड म्हणाले की, या सदनिकामालकाने दीड वर्षापासूनचा सोसायटी मेंटेनन्स दिलेला नाही. तरीही, सर्वच सदनिकाधारकांना आधी अंतर्गत दुरुस्ती करून घ्या, म्हणून कळवले होते. तरीही, या मालकाने दुरुस्ती केली नाही, असे सांगितले.