डायलेसीससाठी आलेल्या रुग्णाचा मृत्यु हृदय विकाराच्या धक्याने, आरोग्य विभागाचा प्राथमिक अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:18 PM2018-06-28T16:18:02+5:302018-06-28T16:21:12+5:30
डायलेसीस करतांना ६१ वर्षीय नरेंद्र वाजीराने यांचा मृत्यु हृदय विकाराचा झटका आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. परंतु या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यासाठी तीघा जणांची त्रयस्थ समिती नेमण्यात आली आहे.
ठाणे - ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील डायलेसीस सेंटरमध्ये डायलेसिस करण्यासाठी आलेल्या नरेंद्र वाजीराने (६१) या रुग्णाची अचानक तब्येत बिघडल्याने मृत्य झाल्याची घटना बुधवारी घडली होती. डायलेसिस सेंटरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता. परंतु त्यांचा मृत्यु हा हृदय विकाराच्या धक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपातीपने चौकशी होण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तीन सदस्यांची त्रयस्थ समिती नेमली आहे. या समितीच्या माध्यमातून अहवाल आल्यानंतर जे या प्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोपरी येथील शेठ लाखिमचंद फतीचंद प्रसूतिगृहामध्ये नव्याने सुरु करण्यात आलेल्या डायलेसीस सेंटरमध्ये मयत वाजीराने हे मार्च २०१८ पासून डायलेसीस करण्यासाठी येत होते. बुधवारी देखील ते डायलेसिस करण्यासाठी आल्यानंतर त्यांना आॅक्सिजन लावण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. त्यांना हॉस्पिटलमधून बाहेर काढेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांच्या म्हण्यानुसार आॅक्सिजन संपल्यानंतर त्यांना दुसरे आॅक्सिजन लावेपर्यंत वेळ लागला असल्याने त्यांचा मृत्य झाला.
दरम्यान आता या प्रकरणाला काहीसे वगळे वळण लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. डायलेसीससाठी येणाºया या रुग्णाला हार्टचा त्रास होता, तसेच त्यांची बायपास देखील झाली होती. शिवाय डायबेटीस आणि हायपरटेन्शनचा देखील त्यांना त्रास जाणवत असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांनी दिली. ज्या वेळेस ते डायलेसीस करण्यासाठी आले होते, त्यावेळेस त्यांना मध्येच शौचाचा त्रास जाणवला होता, त्यामुळे त्यांना शौचालयात नेण्यात देखील आले होते. त्यानंतर येते वेळेसच त्यांची प्रकृती खालावली होती. तसेच त्यांना दोन आॅक्सीजन लावण्यात आले होते, त्यानंतर तिसरा बाटला लावतेवेळेस नातेवाईकांनीच रुग्णाला हलविण्याची विनंती केली होती असेही केंद्रे यांनी स्पष्ट केले. हार्टच्या पेशन्टला एक तर पाठीत दुखु लागते किंवा शौचास येऊ शकते, हे हार्ट अॅटक येण्याचे संकेत समजले जातात. त्यामुळे त्यांचा मृत्यु हार्ट फेलमुळे झाला असावा असे प्रथम दर्शनी वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे या प्रकरणाची दखल घेत आयुक्तांनी त्रीसदस्यीय समिती नेमली असून यामध्ये डॉ. योगेश शर्मा (मेडीसीन प्राध्यायक, कळवा मेडीकल कॉलेज), डॉ. प्रतिभा सावंत (बधरीकरण तज्ञ) आणि डॉ. गुंजोरीकर (किडनी तज्ञ) यांचा त्यात सहभाग असणार आहे. त्यानुसार हे समिती येत्या काही दिवसात या प्रकरणाबाबत अहवाल देणार असून त्यानंतर या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.