विद्यार्थिनीवर अत्याचार करून खून करणाऱ्यास फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:49 AM2019-03-07T04:49:27+5:302019-03-07T04:49:34+5:30
दारूसाठी मोबाइल दिला नाही, म्हणून एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या अशोक मुकणे याला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली.
कल्याण : दारूसाठी मोबाइल दिला नाही, म्हणून एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या अशोक मुकणे याला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. ही घटना सहा वर्षांपूर्वी आसनगाव रेल्वेस्थानक ते सावरोली यादरम्यान घडली होती.
अशोक दारूडा होता. ५ सप्टेंबर, २०१३ रोजी सावरोली येथील प्रेरणा (बदललेले नाव) आसनगाव स्थानकात उतरली. घराच्या दिशेने जाताना मद्यधुंद अशोकने तिची वाट रोखली. जवळपास कुणीच नसल्याचा गैरफायदा घेऊन प्रेरणाचा मोबाइल घेण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केला असता, अशोकने तिला फरफटत निर्जनस्थळी नेले. तिच्यावर अत्याचार केला. जखमी अवस्थेतच गळा दाबून हत्या केली. ठरलेल्या वेळी प्रेरणा घरी न आल्याने तिच्या आईने शहापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. दुसºया दिवशी तिचा मृतदेह आसनगाव रेल्वे स्थानक क्रॉसिंगजवळ आढळला.
पोलिसांनी तपास घेतला असता, मोबाइलचा दारूच्या गुत्त्यावर मिळाला. आरोपीला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अशोकसारख्या प्रवृत्ती समाजासाठी घातक आहेत. मुलींना सुरक्षित जगता यावे, शिक्षण घेता यावे, यासाठी आरोपीला फाशी सुनावल्याचे न्यायालयाने सांगितले.