उपचाराअभावी सहा महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू; ऑक्सिजनची मागणी धुडकावली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 02:43 AM2020-05-29T02:43:52+5:302020-05-29T02:43:57+5:30
आठ दिवसांतील मुंब्य्रातील तिसरी घटना
- कुमार बडदे
मुंब्रा : मुंब्य्रातील सहा महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. ती येथील ठाकूरपाडा परिसरात वास्तव्यास होती. जीव वाचवण्यासाठी तिने एका रुग्णालयातील डॉक्टरकडे दहा मिनिटे आॅक्सिजन लावण्याची मागणी केली होती. डॉक्टरांनी ती धुडकावल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे.
वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मागील आठ दिवसांत मुंब्य्रात तिघींचा मृत्यू झाला आहे. ठाकूरपाड्यातील या महिलेला मंगळवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे तिचा पती अकबर मेंहदीने तिला येथील एका खाजगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तीन तासांनंतर तिचा एक्सरे काढून, छातीत इन्फेक्शन झाल्याचे सांगून पुढील उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. ते रुग्णालयात पोहोचले तेव्हा संध्याकाळचे सव्वापाच वाजले होते.
तेथील नोंद करणाऱ्या परिचारिकेने वेळ संपत आल्याचे कारण सांगून दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर तिला पुन्हा मुंब्य्रात आणले. येथे आणल्यानंतर तिला तीन खाजगी रुग्णालयांत नेण्यात आले. तिची कोरोनाची चाचणी केली नव्हती. त्यामुळे तिला कोरोना असल्यास इतरांना लागण होण्याची शक्यता असल्याचे कारण पुढे करून, तर एका रुग्णालयाने परिचारिका नसल्याचे सांगून दाखल करून घेण्यास नकार दिला.
अखेर एका रुग्णालयाने काही ठिकाणावरून दबाव आल्यानंतर दाखल केले. परंतु तिथेही उपचार सुरू न केल्यामुळे संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू केल्याचे नाटक करण्यास सुरुवात केल्याचा दावा मेंहदी यानी केला. पत्नीच्या मृत्यूमुळे भावनाविवश होऊन, त्यांनी मी माझ्या सहा वर्षांच्या मुलीला तिची आई कुठे गेली, याचे काय उत्तर देऊ, असे उद्विग्न उद्गार काढले.
तीन रुग्णालये सील, गुन्हा दाखल
कोरोनाची चाचणी केली नसल्याचा तांत्रिक मुद्दा समोर करून इतर आजार असलेल्यांना मुंब्य्रातील काही रुग्णालये दाखल करून घेत नसल्याच्या घटना वारंवार उघडकीस आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेने चौकशी करुन मुंब्रा येथील तीन रुग्णालये सील केली आहेत. यासंदर्भातील तक्रारी वाढत असल्याचे पाहून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही इतर रुग्णांवर उपचार करण्याचे सक्त निर्देश रुग्णालयांना दिले होते. त्यामुळे ठाणे पालिकेने मुंब्रा येथील प्राईम, बिलाल आणि युनिर्व्हसल या रुग्णालयांवर कारवाई करीत ती सील करून त्यांच्यावर गुन्हा दाखल दाखल केला आहे.