वर्गात पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू, काशिमीरा येथील घटना : शवविच्छेदनासाठी मृतदेह जेजेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:43 AM2017-10-11T02:43:11+5:302017-10-11T02:43:57+5:30
काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिसर चेकनाक्याजवळ असलेल्या सिंगापूर इंटरनॅशनल शाळेत शिकणारा १७ वर्षाच्या विद्यार्थ्याचा वर्गातच आकस्मिक मृत्यू झाला.
मीरा रोड : काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिसर चेकनाक्याजवळ असलेल्या सिंगापूर इंटरनॅशनल शाळेत शिकणारा १७ वर्षाच्या विद्यार्थ्याचा वर्गातच आकस्मिक मृत्यू झाला. विद्यार्थ्याचा मृतदेह जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
ठाकूर मॉलजवळ असलेली सिंगापूर इंटरनॅशनल ही पंचतारांकित शैक्षणिक संस्था असून या ठिकाणी मुले शाळेच्याच वसतिगृहात राहतात. या शाळेत शशांक राहुल अग्रवाल (१७, रा. त्रिवेणी संगम, पेडर रोड) हा विद्यार्थी १२ वीच्या वर्गात शिकत होता. शशांक हा शाळेच्याच वसतिगृहात राहत होता.
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शशांक हा वर्गात गेला. साडेनऊच्या सुमारास वर्गात अभ्यास करत बसलेला शशांक अचानक खाली पडला. अन्य सहकारी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी प्राथमिक मदत करत नंतर त्याला जवळच्या भक्तीवेदांत रुग्णालयात नेले. परंतु तेथे उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शशांकचा मृतदेह आधी पालिकेच्या टेंबा शवविच्छेदन केंद्रात नेण्यात आला. परंतु त्याचे अल्पवयीन व आकस्मिक मृत्यू पाहता शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला. शशांकच्या मृत्यू प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी नोंद केली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालात मृत्यूचे नेमके कारण समजेल. पण आम्ही तपास सुरू केला आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज मागवले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सानप म्हणाले.