केडीएमसी कामगाराच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
By मुरलीधर भवार | Published: December 2, 2024 03:57 PM2024-12-02T15:57:46+5:302024-12-02T15:59:32+5:30
तीन वर्षापूर्वी गायकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापश्चात गायकर यांच्या पत्नीने पवार यांच्याकडे पैशाची मागणी केली.
कल्याण: जागेच्या व्यवहारातून झालेल्या वादात एका केडीएमसी कामगाराला जीवे ठार मारण्याची धमकी देणयात आली आहे. एकनाथ पवार असे या कामगाराचे नाव आहे. टिटवाळा पोलिसांनी कामगाराच्या कुटुंबियाला पोलिस संरक्षण दिले आहे. मात्र पवार कुटुंबिय भितीच्या सावटाखाली आहे. कारण धमकी देणारा व्यक्ती निलेश शेलार याची गुन्हेगारी असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. शेलार याच्या सह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक करावी अशी मागणी पवार यांनी केली आहे.
टिटवाळा येथील उंबार्णी गावात एकनाथ पवार हे त्यांची पत्नी, मुलगी, आई यांच्यासोबत राहतात. ते कल्याण डोंबिवली महापालिकेत सफाई कामगार आहेत. त्यांची मानिवली येथे ८७ गुंठे जागा आहे. या जागेपैकी दोन गुंठे जागा त्यांनी रमण गायकर यांना विकली होती.
तीन वर्षापूर्वी गायकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापश्चात गायकर यांच्या पत्नीने पवार यांच्याकडे पैशाची मागणी केली. पवार यांनी सांगितले की, जागेच्या मोबदल्यात त्यांना २ लाख ११ हजार रुपये यापूर्वीच दिले आहेत. त्याचा तपशीलही पवार यांच्याकडे आहे. मात्र गायकर यांच्या पत्नी यांनी जागेच्या व्यवहाराची रक्कम २ लाख ११ हजार रुपये नसून २ लाख ६१ हजार रुपये असल्याचे सांगून उर्वरित पैसे द्यावे असा तगादा लावला होता.
दरम्यान पवार यांच्या जागेवर पाईप लाईन टाकण्याचे काम सुरु होते. त्यांना हे कळताच त्यांनी जागेच्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी त्याठिकाणी शेलार हा त्यांच्या साथीरादारांसोबत उभा होता. पवार यांना पाहून शेलार याने जातीवाचक शिविगाळ केली. त्याना मारहाण केली. त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेतली.
शेलारचा साथीदार रवि निकम याने त्याच्या जवळची रिव्हा’ल्वर काढून पवार यांच्या कंबरेखाली लावून पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पवार यांनी टिटवाळा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पवार यांची तक्रार दाखल करुन शेलार याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पवार यांच्या घराला पोलिस संरक्षण दिले आहे. शेलार हा गुंड प्रवृत्तीचा इसम आहे. तो एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. त्याच्याकडूुन माझ्या कुटुंबाच्या जिवितास धोका आहे. त्याला अटक करुन त्याच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पवार यांनी पोलिसांकडे केली आहे.