उल्हासनगरचे माजी नगरसेवक गोदुमला किशनानी यांच्यासह मुलाला जीवे मारण्याची धमकी
By सदानंद नाईक | Published: December 4, 2024 09:06 PM2024-12-04T21:06:44+5:302024-12-04T21:10:03+5:30
अज्ञात व्यक्तीने गुंड रवी पुजारीच्या नावाने धमकी, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिकेचे माजी नगरसेवक व उधोजक गोदूमल किशनानी यांच्यासह मुलाला एका अज्ञात व्यक्तीने गुंड रवी पुजारी यांचे नाव घेऊन न्यायालयीन खटल्यात साक्ष देण्यास गेल्यास जिवेठार मारण्याची धमकी आली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात माजी नगरसेवक व उधोजक गोदुमल किशनानी कुटुंबासह राहतात. ३० नोव्हेंबर रोजी रात्री गोदूमल किशनानी यांचा मुलगा प्रवीण यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. एका न्यायालयीन खटल्यात गोदूमल किशनानी व प्रवीण किशनानी यांची साक्ष असून त्या खटल्यात साक्ष देण्यास जाऊ नये, असे सांगण्यात आले. साक्ष देण्यासाठी गेल्यास जिवेठार मारण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने गुंड रवी पुजारी यांचे नाव घेऊन दिली.
या प्रकाराने घाबरलेल्या गोदुमल किशनानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देऊन तक्रार दाखल केली. किशनानी यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीसह रवी पुजारी याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.