रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे डेक्कन क्विनने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशाचा मृत्यु; प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 09:32 PM2020-01-07T21:32:30+5:302020-01-07T21:33:09+5:30
रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रथमोपचाराची सोय करावी
डोंबिवली: पुणे रेल्वे स्थानकातुन नेहमी प्रमाणे सकाळी 7.15 वाजता सुटणारी पुणे मुंबई दख्खनची राणी (12124) लोणावळा रेल्वे स्थानकातुन सुटत असतानाच अचानक गाडीतील D2 डब्यातील अंदाजे ५० वर्ष वय असलेल्या डि. एम. जैन नामक प्रवाशास तीव्र ह्रदय विकाराचा झटका आला. त्यामुळे डब्यातील इतर प्रवाशांनी गाडीची साखळी खेचुन गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु, गाडी काही थांबली नाही, म्हणुन प्रवाशांनी गाडीची साखळी खेचुनच ठेवली, गाडीची साखळी खेचुन ठेवल्यामुळे गाडी खंडाळा रेल्वे स्थानकात थांबली. परंतु, तोपर्यंत खुप उशिर झाला होता.
ह्रदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या रेल्वे प्रवाशाने प्राण सोडले होते. सदर घटना गाडीतील प्रत्यक्षदर्शींनी आपल्या समोरच घडल्याचे कळविले. गाडीची साखळी लोणावळा रेल्वे स्थानकात खेचली होती. जर, त्याच क्षणी गाडी लोणावळा रेल्वे स्थानकात थांबवली गेली असती तर कदाचित प्रवाशाचे प्राण वाचले असते असेही गाडीतील काही प्रवाशांनी सांगितले. गाडीची साखळी खेचुन देखील गाडी थांबली नाही ह्याचा अर्थ गाड्यांची व्यवस्थित देखभाल दुरुस्ती योग्य प्रकारे होत नाही, देखभाल दुरुस्तीच्या केवळ तारखाच बदलल्या जातात असे वाटते किंवा साखळी खेचुनही गाडी थांबवायची नाही अशा सुचनाच गाडीच्या इंजिन चालकास तर दिल्या गेल्या नाहीत ना हे ही तपासणे गरजेचे आहे. कारण, कित्येक वेळा अडचणीच्या समयी गाडीची साखळी खेचुन देखील गाडी थांबत नाही असेही काही प्रवाशांचे म्हणणे आहे.
वातानुकूलित डब्यांमध्ये जसे मदतनीस (Attendance) असतात त्याप्रमाणे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये देखील प्रथमोपचार करणारे मदतनीस हवेत. जेणेकरून प्रवासादरम्यान अशाप्रकारे गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर निदान एखाद्या प्रवाशाचे प्राण तरी वाचतील. तरी, मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या जिविताचा व सुरक्षेचा विचारविनिमय करुन योग्य ती उपाययोजना करावी. हि नम्र विनंती असल्याचे कर्जत प्रवासी संघटनेचे प्रभाकर गंगावणे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.