विजेची वायर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा मृत्यू, कल्याणला संतप्त जमावाची पार्थिवासह महावितरण कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 04:59 PM2017-09-10T16:59:04+5:302017-09-10T21:21:30+5:30
कल्याण दि.10 सप्टेंबर : विजेची वायर अंगावर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा आज मृत्यू झाल्याने स्थानिक कमालीचे संतप्त झाले ...
कल्याण दि.10 सप्टेंबर : विजेची वायर अंगावर पडून जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याचा आज मृत्यू झाल्याने स्थानिक कमालीचे संतप्त झाले होते. तसेच नुकसानभरपाई मिळेपर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेत स्थानिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. मात्र भाजपा पदाधिकाऱ्यांनी नुकसानभरपाईबाबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित कुटुंबीयांचे बोलणे करून दिल्यानंतर हा तणाव निवळला.
पिसवली गावात राहणाऱ्या जितेंद्र तिवारी हा भाजी विक्रेता 4 सप्टेंबरला विजेची वायर अंगावर पडून 60 टक्के भाजला होता. त्याच्यावर सुरुवातीला एम्स आणि मग नंतर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला. त्यामूळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी जितेंद्र यांच्या पार्थिवासह टाटा पॉवर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. तसेच तिवारी याच्या कुटुंबीयांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. परंतु भाजपा कल्याण डोंबिवली शहर सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाची समजूत काढली. तसेच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी तिवारी यांच्या भावाचे बोलणे करून दिले. त्यानंतर हा जमाव शांत झाला आणि त्यांनी पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले.
तिवारी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या पत्नीला महावितरणमध्ये नोकरी द्यावी आणि उपचाराचा संपूर्ण खर्च द्यावा, असे ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी बोलणे झाल्याचे शिवाजी आव्हाड यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणीही स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.