ISIS मध्ये भरती होण्यासाठी घर सोडून पळून गेलेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 09:21 AM2017-10-26T09:21:26+5:302017-10-26T09:34:27+5:30
इसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू झाला आहे. 2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होते.
कल्याण - इसीस या दहशतवादी संघटनेत भरती होण्यासाठी आपल्या तीन मित्रांसोबत घरातून पळून गेलेल्या 24 वर्षीय फरहाद शेखचा मृत्यू झाला आहे. 2014 मध्ये कल्याणचे चार तरुण इसीसमध्ये भरती होण्यासाठी घरातून पळून गेले होते. फरहादचे वडिल तनवीर शेख यांनी मंगळवारी संध्याकाळी एका अज्ञात नंबरवरुन फोन आला होता. यावेळी समोरच्या व्यक्तीने त्यांना तुमचा मुलगा आता जिवंत नाही असं सांगितलं. संभाषणाची सुरुवात समोरच्या व्यक्तीने आधी इंग्रजीत केली, नंतर हिंदीत बोलण्यास सुरुवात केली अशी माहिती तनवीर शेख यांनी दिली आहे. सीरियामध्ये लढत असताना फरहादचा मृत्यू झाला असून, लवकरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती फोनवर बोलणा-या व्यक्तीने दिली.
'यापुढे मी सहन करु शकत नसल्याने, मी फोन पत्नीकडे दिला', असं तनवीर यांनी सांगितलं. 'फोनवर बोलणा-या व्यक्तीने आपली ओळख उघड केली नाही. फोन करण्यासाठी त्याने इंटरनेट प्रोटोकॉल क्रमांकाचा वापर केला होता', अशी माहिती तनीवर यांनी दिली आहे.
2014 मध्ये चौघे तरुण बेपत्ता झाल्यापासून तपास करणा-या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकासोबत (एटीएस) ही माहिती शेअर करण्यात आली आहे. 'आम्ही आमचा फोन क्रमांकही एनआयएला दिला आहे जेणेकरुन सीरिया किंवा इराकमधील भारतीय अधिका-यांशी बातचीत केल्यानंतर मिळालेली माहिती ते आमच्यापर्यंत पोहचवू शकतील', असं तनवीर शेख बोलले आहेत. अधिका-यांकडून माहितीला दुजोरा मिळाल्यानंतरच फरहादवर अंत्यसंस्कार करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं आहे.
ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं आहे की, 'फरहाद बेपत्ता झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आलेल्या बाजारपेठ पोलीस ठाण्यातच तनवीर शेख यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. आम्ही आधीच एनआयए आणि एटीएसला यासंबंधी कळवलं आहे'.
नोव्हेंबर 2014 रोजी अमन नदीम तांडेल याच्या कुटुंबियांनाही अशाच प्रकारे एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन मृत्यू झाल्याचं कळवलं होतं. इसीसच्या एका व्हिडीओत अमन दिसला होता, ज्यामध्ये तो गुजरात, काश्मीर आणि मुझफ्परनगरमधील मुस्लिमांच्या मृत्यूचा बदला घेण्याची धमकी देत होता.
यानंतर जानेवारी 2015 मध्ये साहिन टंकीच्या खास मित्राला अज्ञात कॉलरकडून त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली होती. 2014 मध्ये टंकीने बेपत्ता झालेल्यांपैकी एक अरीब माजिदच्या कुटुंबियांना फोन करुन सीरियामध्ये अरीब शहीद झाल्याचं सांगितलं होतं. पण नंतर ही माहिती खोटी असल्याचं स्पष्ट झालं होतं. दोन महिन्यानंतर अरीब माजिदने स्वत:ची सुटका करुन घेत इसीसच्या तावडीतून पळ काढला आणि तुर्कीश अधिका-यांसमोर आत्मसमर्पण केलं. नंतर एनआयएने त्याला अटक केली.