इसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणच्या तरुणाचा मृत्यू, सोशल मीडियावर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:32 AM2017-10-27T05:32:22+5:302017-10-27T05:32:55+5:30
कल्याण : इसिस या दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या कल्याणच्या फहाद शेख (वय २४) याचा मृत्यू झाला आहे.
कल्याण : इसिस या दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या कल्याणच्या फहाद शेख (वय २४) याचा मृत्यू झाला आहे. २०१४मध्ये तो अन्य तिघांसह घरातून पळून गेला होता. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी बुधवारी एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या वडिलांना फोनद्वारे दिली.
फहादचे वडील तनवीर यांना फोन करणाºया व्यक्तीने इंटरनेट प्रोटोकॉल क्रमांकाचा वापर केला होता. त्याने तनवीर यांना तुमचा मुलगा जिवंत नाही. त्याचा सीरियातील एका चकमकीत मृत्यू झाला आहे. लवकरच त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सांगितले. फोनवरील व्यक्तीने सुरुवातीस इंग्रजी व नंतर हिंदी भाषेत संभाषण केले. तसेच त्याने त्याचे नाव व ओळखही सांगितली नाही. मुलाचा मृत्यू झाल्याचे कळताच कॉल सुरू असताना तनवीर यांनी फोन पत्नीच्या हातात दिला. तोपर्यंत कॉल कट झालेला होता.
यासंदर्भात त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली आहे. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला आहे. तनवीर यांना आलेल्या कॉलची माहिती दहशतवादविरोधी पथक व एनआयएला दिली असल्याचे ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी स्पष्ट केले.
कल्याणच्या मुस्लीम मोहल्ल्यात राहणारे आरीब माजिद, अमन तांडेल, साहिम तानकी आणि फहाद शेख हे चार जण २६ मे २०१४ रोजी बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांच्या पालकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र काही दिवसांनी चार बेपत्ता तरुणांपैकी एकाच्या कुटुंबीयाच्या मोबाइलवर मेसेज आला की, आम्ही सहीसलामत आहोत. आता पुढील भेट जन्नतमध्ये होईल. यावरून त्यांनी इसिस या दहशतवादी संघटनेत भरती झाल्याचा कयास मांडला. त्यानंतर एका वेबसाइटवर आरीब माजिद हा मारला गेल्याचे वृत्त झळकले. त्याने तेथे एका तरुणीशी लग्नही केल्याचा दुजोरा दिला गेला होता. त्याच्या मृत्यूनंतर कल्याणमध्ये गैबना नमाज अदा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात आरीब याने इसिसच्या तावडीतून सुटका करून तुर्की अधिकाºयांसमोर आत्मसर्मपण केले होते. त्यामुळे तो जिवंत असल्याचे उघडकीस आल्याने त्याच्या मृत्यूची बातमी खोटी ठरली. तो भारतात परतताच त्याला विमानतळावर अटक करण्यात आली. आरीब हा सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे.
दरम्यान, २०१६मध्ये अमन तांडेल व साहिम तानकी हे दोघे सीरिया येथे दहशतवादी हल्ला करताना मारले गेले. त्यानंतर फहादही मारला गेल्याची बातमी त्याच्या कुटुंबीयांना कळाली आहे. फहाद हा सीरियात फिरत असताना मारला गेल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.