मुझफ्फर यांच्या भावाच्या भाजपप्रवेशाने वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:15 AM2019-09-02T00:15:55+5:302019-09-02T00:16:19+5:30

मेहतांची अडचण वाढणार : २० वर्षांपूर्वीच कुटुंबाने केले मुनावर यांना दूर

Debate over Muzaffar's brother's entry into BJP | मुझफ्फर यांच्या भावाच्या भाजपप्रवेशाने वाद

मुझफ्फर यांच्या भावाच्या भाजपप्रवेशाने वाद

Next

मीरा रोड : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी काँग्रेस नेते तथा माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचे भाऊ मुनावर यांचा भाजपप्रवेश घडवून आणण्याचा चालवलेला प्रचार त्यांच्याच अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. कारण, मुझफ्फर यांच्या वडिलांनी मुनावर यांना २० वर्षांपूर्वीच कुटुंबातून दूर केले असून, तेव्हापासून मुझफफर यांच्याशी संपर्कच नाही. त्यातच मुनावर यांच्यावर अनधिकृत बांधकामप्रकरणी पालिकेने गुन्हा दाखल केला असून, त्यांचे पुनर्विकासाचे काही प्रकल्पदेखील बारगळल्याने लोकांमध्ये संताप आहे. त्यामुळे मुनावर यांच्या प्रवेशाने मेहतांचीच अडचण वाढण्याची शक्यता आहे.

मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून यंदा काँग्रेसच्या वतीने माजी आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीच्या वतीने सदर मतदारसंघ काँग्रेसला सोडल्याचे जाहीर करून मुझफ्फर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे मुझफ्फर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी चालवली आहे. दुसरीकडे, भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना मुझफ्फर हे प्रतिस्पर्धी ठरणार असल्याने मेहतांनीदेखील स्वत: आणि नगरसेवकांच्या माध्यमातून मुझफ्फर यांच्या उमराव ट्रस्टचे रुग्णालय लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे आणि काँग्रेस समर्थक नगरसेवकांनासुद्धा फोडण्याचे प्रयत्न मेहतांनी चालवले असून, नरेश पाटील व अमजद शेख यांना फोडण्यात ते यशस्वी ठरले आहेत. परंतु, मुनावर ऊर्फ मुन्ना हुसेन यांचा भाजपप्रवेश घडवून आणत मेहता यांनी शहरात काँग्रेस नेते मुझफ्फर यांचा भाऊच भाजपमध्ये आल्याचा जोरदार प्रचार चालवला आहे. यातून मुझफ्फर व त्यांच्या कुटुंबीयांना धक्का देण्याचा प्रयत्न मेहतांनी केलाय. परंतु, मुनावर यांच्या भाजपप्रवेशामागे केवळ राजकीयच नव्हे तर आर्थिक समीकरणेदेखील जुळल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

कारण, हुसेन कुटुंबीयांना जवळून ओळखणाऱ्यांना मुनावर यांची वस्तुस्थिती माहिती आहे. १९९५ च्या दरम्यान सय्यद नजर हुसेन यांनी मुनावर यांच्या गोष्टी न पटल्याने त्यांना कुटुंबातून दूर केलेले आहे. तेव्हापासून मुझफ्फर यांनीदेखील मुनावर यांच्याशी राजकीय वा व्यावसायिक तर सोडाच, पण कौटुंबिक संबंध पण ठेवलेले नाहीत. त्याला कारणेदेखील आहेत. मुळात मुनावर काँग्रेस वा अन्य राजकीय पक्षात नव्हते. ते मीरा रोडमध्ये राहतदेखील नाहीत. उलट, नयानगर भागात एका वाढीव बेकायदा इमारतीचे मजले बांधल्याप्रकरणी महापालिकेने त्यांच्यावर एमआरटीपीचा वर्षभरापूर्वी गुन्हा दाखल केला आहे. वरचे मजले बेकायदा असल्याने पालिकेचा त्यावर कारवाईचा हातोडा पडणार आहे. याशिवाय, मुनावर यांनी काही जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम घेतलेले आहे, तेदेखील रखडलेले आहे. त्यामुळे त्यातील रहिवासी संतापले आहेत. नयानगर पोलीस ठाण्यात या तक्रारीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे बांधकामांवर कारवाई टाळण्यासह अन्य कायदेशीर अडचणींमध्ये पालिका आणि प्रशासनावर पकड असणारे भाजप आ. नरेंद्र मेहता यांची मोठी मदत मुनावर यांना होणार आहे.

मुनावर यांना घेण्यामागे अर्थपूर्ण कारण

च्मुझफ्फर यांच्या भावाने भाजपमध्ये प्रवेश केला, असा प्रचार करून शहरातील नागरिकांमध्येदेखील चर्चेचा विषय घडवून मुझफ्फर व कुटुंबीयांना राजकीय धक्का देण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे स्पष्ट आहे.
च्मेहतांनी मुनावर यांना भाजपमध्ये आणण्यामागे राजकीयच नव्हे तर अर्थपूर्ण कारण असल्याचे स्थानिक जाणकार सय्यद मोईनुद्दीन, साबीर शेख यांचे म्हणणे आहे.
च्मुनावर यांचा भाजपप्रवेश मेहतांच्याच अडचणीचा ठरणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

Web Title: Debate over Muzaffar's brother's entry into BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.