ठाण्यातील पाणथळ जागेवर डेब्रिजचा भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:44 AM2019-03-01T00:44:39+5:302019-03-01T00:44:39+5:30
आठ हजार मेट्रिक टन डेब्रिज : जिल्हा प्रशासनास नोटीस
ठाणे : कासारवडवली भागातील तब्बल ६० एकरांच्या जागेवर मागील तीन महिन्यांपासून डेब्रिजचा भराव टाकला जात होता. ठाण्यातील पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांच्या पाठपुराव्यानंतर पाणथळ नियंत्रण समितीने दिलेल्या अहवालानंतर ज्या ठिकाणी भराव टाकला जात होता, ती जागा पाणथळ असल्याचे उघड झाले. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका या डेब्रिजमाफियांवर कारवाई करणार की नाही, याबाबत जोशी यांनी थेट जिल्हा प्रशासनाला नोटीस बजावली आहे.
कासारवडवली येथील महापालिकेच्या ट्रॅफिक पार्कच्या पाठीमागील बाजूस असलेल्या राममारुती रोड येथील ६० एकरांच्या जागेवर भराव टाकला जात असल्याचे जोशी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जानेवारी महिन्यात पाणथळ समितीचे अध्यक्ष असलेले तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. या समितीने या जागेची पाहणी करून एक अहवाल तयार केला. त्यानुसार, या ठिकाणी मागील तीन ते चार महिन्यांत तब्बल आठ हजार मेट्रिक टन डेब्रिज टाकल्याची माहिती समोर आली होती. तसेच समितीच्या वतीने अविनाश भगत आणि सीमा हर्डीकर या तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. यात त्यांना कोंब डक जातीचा बदक आढळला होता. जो केवळ पाणथळ जागेवरच आढळतो. तसेच जोशी यांनासुद्धा या जागेचे २०१७, २०१८ आणि २०१९ चे छायाचित्र उपलब्ध झाले होते. त्यानुसार, ही जागा पाणथळ असल्याचे शिक्कामोर्तब झाले.
कन्स्ट्रक्शन - डिमॉलिशन वेस्ट धोरण कागदावरच
मधल्या काळात डेब्रिज साहित्यावर कारवाईचे अधिकार महापालिकेला असतात, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार, पालिकेकडे यासंदर्भात तक्रार केली असता, त्यांनी कन्स्ट्रक्शन्स अॅण्ड डिमोलेशन वेस्ट या धोरणाची अंमलबजावणीच झाली नसल्याची बाब समोर आली.
वास्तविक २०१७ मध्ये या धोरणाची अंमलबजावणी अपेक्षित होती. या घटनेनंतर तडकाफडकी हे धोरण तयार केले. कारवाई मात्र अद्यापही झालेली नाही. आता यासंदर्भात जिल्हाधिकारी प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावून ही जागा जशी होती, तशीच करावी, अशी जोशी यांची मागणी आहे. अन्यथा, न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.