माळशेज घाटातील दरड हटवल्याने वाहतूक सुरू, पर्यटकांना बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 10:27 AM2018-08-25T10:27:25+5:302018-08-25T15:07:20+5:30
पावसामुळे 20 ऑगस्ट रोजी माळशेज घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता.
ठाणे - पावसामुळे 20 ऑगस्ट रोजी माळशेज घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून रस्ता बंद झाला होता. राष्ट्रीय महामार्ग, महसूल विभाग, पोलीस यांनी भर पाऊस आणि दाट धुके असूनही दरड, माती दूर करण्यात यश मिळविले असल्याने चार दिवसानंतर वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र माळशेज घाटातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी 1 किमी परिसरात पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लोकमतला दिली.
शनिवारी, रविवार या सुट्टीच्या काळात पर्यटक माळशेज घाटात धाव घेतात. पण दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यटकांना ही बंदी घातली आहे. दरड कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निर्देशाप्रमाणे माळशेज घाटातील सर्व धबधब्यांच्या ठिकाणी एक किमी परिसरात पर्यटकांसाठी प्रतिबंधात्मक आदेश तहसीलदार सचिन चौधर यांनी जारी केले आहेत.
सुट्ट्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर पर्यटक गर्दी करतात, कुठलीही दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये म्हणून हे आदेश काढण्यात आले आहेत. खोल पाण्यात उतरणे, धबधब्याच्या ठिकाणी जाणे, धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहने वेगाने चालविणे, या परिसरात मद्यपान करून प्रवेश करणे, मोठमोठ्याने संगीत लावणे, महिलांची छेडछाड असे प्रकार झाल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गच्या मुरबाड उप विभागीय कार्यालयाने कठीण परिस्थितीत काम करून, जेसीबी, ट्रक्स लावून हा रस्ता पूर्ववत केला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन स्वतः या सगळ्या कामावर लक्ष्य ठेवून होते. याशिवाय प्रांत अधिकारी प्रसाद उकर्डे, मुरबाड तहसीलदार सचिन चौधर आणि त्यांचे कर्मचारी, टोकावडे पोलीस हे लवकरात लवकर या भागातून वाहतूक सुरळीत कधी होईल हे पहात होते.
21 आणि 22 रोजी पावसाचा जोर असल्याने थांबून थांबून काम करावे लागत होते. शिवाय दरड दूर केलेली असली तरी डोंगर माथ्यावरून सतत पाण्याचे प्रवाह, छोटे छोटे दगड रस्त्यावर येतच होते त्यामुळे कामाचा वेग मंदावला होता. नंतरचे दोन दिवस पाऊस बऱ्यापैकी कमी झाल्याने कामही झपाट्याने पूर्ण करता आले आणि काल उशिराने वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली. वाहतूकीस परवानगी दिलेली असली तरी या भागातून सावधगिरी बाळगूनच वाहने नेण्यात येत असून पोलीस आणि महामार्ग कर्मचारी तैनात आहेत.