कर्जबाजारी झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:40 AM2021-07-31T04:40:15+5:302021-07-31T04:40:15+5:30

डोंबिवली : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने निराश झालेल्या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवली पूर्वेत ...

Debt-ridden trader commits suicide | कर्जबाजारी झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारी झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या

Next

डोंबिवली : लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने निराश झालेल्या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवली पूर्वेत एका व्यापाऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना सोमवारी घडली. एकापाठोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे व्यापारीवर्गातून चिंता व्यक्त होत आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेकांवर बेकारीचे संकट कोसळले असताना व्यापारीही यात भरडले गेले आहेत. कल्याण पूर्वेतील बंडू पांडे या प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे व्यवसाय डबघाईला आल्याने पांडे आर्थिक संकटात सापडले होते. दरम्यान, डोंबिवली पूर्वेत सुरज सोनी यांनादेखील लॉकडाऊनमध्ये व्यवसाय बंद करावा लागला. गेल्या दीड वर्षात उपजीविकेसाठी अन्य नोकरीही न मिळाल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. दावडी परिसरात पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहणाऱ्या सुरज यांचे डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात मोबाईलचे दुकान होते. ते नोटबंदी काळात बंद झाले. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर स्टॉल लावून मोबाईल विक्री आणि दुरूस्तीचे काम सुरू केले. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्यांचा हा व्यवसायदेखील बंद पडला. त्यांनी दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात अपयश आले. उपजीविकेचे कोणतेच साधन नसल्याने घरची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती. यात वीजबिल भरण्यासाठीदेखील सुरजकडे पैसे नव्हते. थकलेलं घरभाडं, वाढत चाललेली उसनवारी आणि त्यात कोसळलेले बेरोजगारीचे संकट या नैराश्येत त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती त्यांचे मेहुणे सुरेश सेठ यांनी दिली. या घटनेची नोंद मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाही निर्बंध कायम आहेत. त्यामुळे व्यापारी अडचणीत आले आहेत. तरीही सरकार निर्णय घेत नसेल तर आत्महत्येसारख्या घटना घडतच राहतील, अशा संतप्त भावना व्यापारीवर्गाकडून व्यक्त होत आहे.

-----------------

व्यवसायांवर संक्रांत

डिजिटल तसेच ऑनलाईनचा वापर वाढल्यामुळे प्रिंटिंग व्यवसाय डबघाईला आला आहे. राज्य सरकारच्या जाचक अटींमुळेही या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशातच लॉकडाऊनमुळे दीड ते दोन वर्षे व्यवसाय बंद आहे. डिजिटलचा वापर आपण समजू शकतो. परंतु सरकारने जाचक अटी रद्द कराव्यात, असे कल्याण - डोंबिवली प्रिंटिंग असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र पोपळे यांचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद असल्याने आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. त्यामुळे दुकानाचे तसेच घरभाडे कसे भरायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे काही व्यापारी तणावात आहेत, ही वस्तुस्थिती असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

----------------------

Web Title: Debt-ridden trader commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.