मालमत्ता करात ५० टक्के सवलतीचा निर्णय कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:28 AM2020-08-26T00:28:09+5:302020-08-26T00:28:21+5:30

मीरा-भाईंदर पालिका : १३ दिवसांनी मिळाली ठरावाची प्रत

Decision of 50% relief in property tax on paper | मालमत्ता करात ५० टक्के सवलतीचा निर्णय कागदावर

मालमत्ता करात ५० टक्के सवलतीचा निर्णय कागदावर

Next

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या १३ आॅगस्ट रोजी झालेल्या आॅनलाइन महासभेत नागरिकांना ३१ आॅक्टोबरपर्यंत कर भरल्यास ५० टक्के कर माफ तर आधीची थकबाकीही भरल्यास त्यावरील व्याज पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ठरावाची प्रत कर विभागास मंगळवारी १३ दिवसांनी मिळाली आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची झालेली असल्याने मालमत्ता कराच्या घरपट्टीत त्यांना सवलत देण्याचा निर्णय महासभेने घेतला असल्याचे महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी सांगितले होते. ३१ आॅक्टोबरपर्यंत निवासी वा वाणिज्य वापरचा मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना करात ५० टक्के घरपट्टीत सवलत दिली जाणार; त्याचप्रमाणे ज्यांची आधीची थकबाकी आहे त्यांनीही ३१ आॅक्टोबरपर्यंत कर भरल्यास त्यांचे सर्व व्याज माफ केले जाणार, असे ठरावात नमूद केले होते.

दुसरीकडे, महासभेत काँग्रेसने नागरिकांचा १०० टक्के कर माफ करण्याचा ठराव मांडला होता. परंतु सत्ताधारी भाजपने १०० टक्के कर माफ करण्याची मागणी फेटाळून लावली व ५० टक्के मालमत्ता कर माफ करणार, असा निर्णय घेतला होता. पालिका प्रशासनाने मात्र १० टक्क्यांपर्यंतच मालमत्ता कर माफ केला जाऊ शकतो, असे महासभेत स्पष्ट केले होते. सत्ताधारी भाजपने महासभेत ५० टक्के करमाफी केल्याचे जाहीर केल्याने नागरिकांनी कर भरणा करताना ५० टक्के सवलत मागण्यास सुरुवात केली. परंतु पालिकेचा तसा आदेश आला नसल्याने करमाफी मिळत नसल्याचे कर्मचारी सांगत आहेत.

आयुक्तांच्या निर्णयाकडे लागले लक्ष
महासभा १३ आॅगस्ट रोजी होऊनही करमाफीचा ठरावच कर विभागाकडे आला नव्हता. ठराव आल्यावर त्यावर प्रस्ताव तयार करून तो आयुक्तांकडे मंजुरीला पाठविला जाणार होता. परंतु महासभेत केलेला ठरावच आला नसल्याने प्रस्ताव रखडला. अखेर १३ दिवसांनी म्हणजेच मंगळवारी कर विभागाकडे महासभेचा ठराव सचिव कार्यालयाकडून आला आहे. प्रशासनाने १० टक्के कर सवलत देता येऊ शकते, असे महासभेत स्पष्ट केले असल्याने कर विभाग काय प्रस्ताव बनवतोय व त्यावर आयुक्त काय निर्णय घेतात? हे लवकरच स्पष्ट होईल.

Web Title: Decision of 50% relief in property tax on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.