निर्णय मान्य, पण मंदिर भूमिपूजनाची घाई नको...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 03:35 AM2020-08-05T03:35:09+5:302020-08-05T03:35:36+5:30
मुंब्रा येथील रहिवाशांच्या प्रतिक्रिया : कोरोना संकटाच्या काळात थांबायला हवे!
कुमार बडदे
मुंब्रा : अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे, याबद्दल आनंद आहे. मात्र देशात कोरोनाने थैमान घातले असून, ८० टक्के लोकांनी रोजगार गमावला असताना भूमिपूजनाची घाई योग्य नसल्याच्या प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिल्या.
सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. अशावेळी राम मंदिराचे भूमिपूजन करणे चुकीचे आहे. भूमिपूजनाऐवजी सरकारने कोरोनामुळे बेरोजगार झालेल्यांना पुन्हा रोजगार कसा मिळेल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे होते. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आजही देशातील ८० टक्के नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे. ती सावरण्यासाठी त्यांना कशी आर्थिक मदत देता येईल, देशातील बंद असलेले उद्योगधंदे पुन्हा कसे सुरळीत सुरू होतील, यासाठी सर्वप्रथम पावले उचलणे आवश्यक होते. केवळ बिहार निवडणुकीवर डोळा ठेवून भूमिपूजनाची घाई केली जात आहे हे सर्व जाणतात, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राम मंदिराची उभारणी होत आहे, ही आनंदाची बाब आहे. प्रभुराम यांनी जगाला त्याग आणि सेवा करण्याची शिकवण दिली. त्याचा अंगीकार नेत्यांनी करण्याची गरज आहे. रामाच्या नावाने सध्या जे राजकारण सुरू आहे ते मान्य नाही. ज्या ठिकाणी आता भूमिपूजन करण्यात येणार आहे तेथे १९८९ मध्ये मंदिराच्या नूतनीकरणासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. बुधवारी पुन्हा प्रदर्शन करून भूमिपूजनाची आवश्यकता नव्हती. कोरोनाचे थैमान सुरू असताना हा कार्यक्रम पुढे ढकलला असता तर बरे झाले असते.
- इसाहक बिराजदार, लेखक, दूरदर्शन
भूमिपूजन काही दिवसांनी झाले असते, तर काही बिघडले नसते. सध्या देश संकटात असताना इतकी घाई करण्याची गरज नव्हती.
- फैसल चौधरी,
सामाजिक कार्यकर्ता
अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी बुधवारी होत असलेल्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जादा कुमक मागविण्यात आलेली नाही.
- मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस ठाणे
आम्ही देशाचे संविधान मानतो. संविधानामधील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अंतिम आहे. यामुळे न्यायालयाचा निर्णय मान्य आहे. काही जण राजकीय हेतूने मंदिर उभारणीला विरोध करीत आहेत. त्यांचा हा विरोध ९९.९९ टक्के मुस्लीम नागरिकांना मान्य नाही. परंतु कोरोनाचे संकट सुरू असताना भूमिपूजनाचा कार्यक्रम एवढ्या घाईने उरकण्याची गरज नव्हती. उत्तरेतील काही राज्यांमध्ये आगामी काही महिन्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भूमिपूजनाची घाई करण्यात आली हे उघड आहे.
- हसन मुल्लाणी, प्राध्यापक
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे. मंदिर उभारणीसाठी बुधवारी होत असलेले भूमिपूजन आणि आणि त्यानंतर मंदिराची उभारणीही सुरळीत व्हावी. पण पुन्हा १९९२ सारखी परिस्थिती उद्भवू नये. त्यावेळी दंगलीनंतर जीवाच्या भीतीने मुंबईतून मुंब्रा येथे आलो होतो. तेव्हा झालेले हाल भोगावे लागू नयेत. कुणावरही स्थलांतरित होण्याची वेळ येऊ नये हीच अपेक्षा आहे.
- अन्सार अहमद सिद्दिकी,
भाजी विक्रेता