ठाण्यात सीएसआर फंडातून झोपडपट्टीतील प्रत्येक घरात शौचालय उभारण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 01:44 AM2021-02-13T01:44:09+5:302021-02-13T01:44:23+5:30
वर्षभरात हजार शौचालये उभारणार
ठाणे : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ठाणे महापालिकेने आता झोपडपट्ट्यांमधील प्रत्येक घरात शौचालय उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १८ फेब्रुवारीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. यासाठी सीएसआर फंडाचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार झोपडपट्ट्यांमधील घरांचे सर्वेक्षण करून त्यांना गुगल कंपनीच्या मदतीने गुगल प्लस कोड देण्यात येणार आहेत. तो नसलेल्या घरांमध्ये शौचालयांची उभारणी केली जाणार असून येत्या वर्षभरात एक हजार घरांमध्ये शौचालयांची उभारणी करण्याचा मानस आहे.
ठाण्याची लोकसंख्या आजमितीस २५ लाखांच्या आसपास आहे. पैकी ५० टक्के नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. घरांमध्ये शौचालयांची सुविधा नसल्यामुळे ते सार्वजनिक शौचालय वापरतात. झोपडपट्टीभागांमध्ये ज्याठिकाणी जागा उपलब्ध आहे, त्याठिकाणी महापालिकेने सार्वजनिक शौचालये उभारली आहेत. काही ठिकाणी ते वापरकर्त्यांची संख्या ७० ते ८० तर काही ठिकाणी ती २५ ते ३० इतकी आहे. मात्र, त्या भागातील लोकसंख्येसाठी ही शौचालये पुरेशी नाहीत. या पार्श्वभूूमीवर महापालिकेने शेल्टर असोसिएट संस्थेच्या मदतीने झोपडपट्टीवासीयांसाठी एक घर एक शौचालय राबविण्याचा प्रस्ताव तयार केला असून यासाठी संबंधित संस्था सीएसआर निधीतून एका घराला १४ हजारांचे बांधकाम साहित्य पुरविणार आहे. त्यासाठी २८ वस्त्यांमधून जीआयएस आणि गुगल तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांची माहिती गोळा करून ती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे.
ठामपाचा एकही रुपया खर्च होणार नाही
शहरात आतापर्यंत केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान या मिशनअंतर्गत ९,४७२ घरांमध्ये शौचालयांची उभारणी केली आहे. तर उर्वरित ठिकाणी अशा प्रकारे ती उभारणीची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मात्र, मलवाहिन्या आणि मलटाकी नसल्यामुळे त्याठिकाणी शौचालय उभारणी करणे शक्य होत नसल्याचे महापालिकेने प्रस्तावात नमूद केले आहे. त्यानुसार आता शौचालयांची उभारणी केली जाणार आहे.
अशा प्रकारे वर्षभरात एक हजार शौचालय उभारणीचा निर्णय संस्थेने घेतला असून यामुळे महापालिकेचा एकही रुपया खर्च होणार नाही. या शौचालयांना मलवाहिनींना जोडणे किंवा मलटाक्यांची निर्मिती करणे अशी कामे महापालिका करणार आहे.