सीसीटीव्हीसाठी २५ हजार देण्याचा ‘ति’चा निर्णय
By Admin | Updated: June 3, 2016 01:56 IST2016-06-03T01:56:12+5:302016-06-03T01:56:12+5:30
टीसी असल्याची बतावणी करून १६ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न करणारी व्यक्ती हा प्रकार घडला तेथे सीसीटीव्ही नसल्याने नेमकी कोण आहे

सीसीटीव्हीसाठी २५ हजार देण्याचा ‘ति’चा निर्णय
ठाणे : टीसी असल्याची बतावणी करून १६ वर्षीय तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न करणारी व्यक्ती हा प्रकार घडला तेथे सीसीटीव्ही नसल्याने नेमकी कोण आहे, त्याचा उलगडा झाला नसल्याने असाच प्रकार अन्य कोणत्याही तरुणी किंवा महिलेच्या बाबतीत घडू नये, यासाठी त्या तरुणीने तिच्या शिक्षणासाठी ठेवलेली एफडी मोडून २५ हजार रुपये सीसीटीव्ही बसवण्याकरिता देण्याचा निर्णय घेतला आहे. तरुणीचा हा निर्णय म्हणजे रेल्वे प्रशासनाला दिलेली चपराक असून आता तरी रेल्वे आणि महापालिका प्रशासनाचे डोळे उघडतील का, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
बदलापूर येथील १६ वर्षीय तरुणी मंगळवारी रात्री ठाण्यातून क्लास सुटल्यावर घरी जात होती. याचदरम्यान, सॅटीसवरील तिकीट घराजवळून रेल्वे पुलावर येताच तोतया टीसीने तिच्याकडे तिकिटाची विचारणा केली. तिने रेल्वे पास दाखवला. मात्र, तरीसुद्धा तुम्हाला मोठ्या साहेबांकडे यावे लागेल, असे सांगून त्याने तिचा हात पकडला आणि स्थानकाबाहेर खेचत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने त्याच्या हाताला हिसका देऊन त्याच्या तावडीतून पळ काढला. हा झालेला प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने हा प्रकार करणारा मोकाट असल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही बसवण्याची जबाबदारी कुणाची, याबाबत पीडितेच्या पालकांनी रेल्वे आणि ठामपा प्रशासनाकडे विचारणा केल्यावर दोघांनी जबाबदारी झटकली. कॅमेरा नसल्यामुळे आपल्या बाबतीत जी दुर्दैवी घटना घडली, ती इतरांच्या बाबतीत घडू शकते, हे लक्षात आल्यावर तिने तिच्या शिक्षणासाठी पालकांनी केलेली २५ हजारांची एफडी मोडली आणि ती रक्कम दिली.