मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घेतले - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 10:59 PM2019-01-22T22:59:49+5:302019-01-22T23:05:05+5:30
मराठा समाजासाठी आमच्या सरकारने कधीही अधांतरी निर्णय घेतलेले नाहीत, आरक्षण असो किंवा शिक्षण आणि रोजगार, आम्ही समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, न्यायालयात देखील लढा देण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.
ठाणे : मराठा समाजासाठी आमच्या सरकारने कधीही अधांतरी निर्णय घेतलेले नाहीत, आरक्षण असो किंवा शिक्षण आणि रोजगार, आम्ही समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत, न्यायालयात देखील लढा देण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.
माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या सत्कार समारोह प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. घणसोलीच्या सेक्टर ७ मधील सिम्प्लेक्स कॉमन मैदान येथे आज सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आदींची उपस्थिती होती. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमदार नरेंद्र पाटील यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर मराठा समाजाच्या युवकांसाठी उचललेल्या पावलांबद्दल मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, युवकांना बँकांनी कर्जे दिलीच पाहिजेत, बँकांचे काही प्रश्न असतील पण समाजाच्या युवकांसाठी शासन प्रयत्न करीत असून बँकांनी सहकार्य केलेच पाहिजे. यासाठी युवकांनी देखील बँकांवर दबाव वाढविला पाहिजे.
वडाळा येथील घरांचा प्रश्न सुटला आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सिडकोच्या घरांमध्ये देखील माथाडींना घरे राखून ठेवली आहेत. घणसोली येथील सिम्प्लेक्स वसाहतीचा क्लस्टर पद्धतीने विकास करण्याचा प्रयत्न कसा करता येईल, हे पाहण्यासाठी लवकरच एक बैठकही आयोजित करण्यात येईल.
नवी मुंबईतील विस्तारित गावठाणांचे सर्व्हेक्षण सिडकोच्या माध्यमातून करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे क्लस्टर तसेच घरांच्या विकासास गती येईल अशी माहितीही त्यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीचा संदर्भ देऊन दिली. माथाडीच्या संघटनेत आम्हाला राजकारण आणायचे नाही. नरेंद्र पाटील हे खूप संवेदनशील आहेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राजकारण आणि समाजकारणात शंकरा प्रमाणे स्वतः विष पचवून अमृत लोकांना द्यावे लागते, मी गेली 4 वर्षे तेच करतोय. मात्र समाजाप्रती असलेली माझी जबाबदारी मी पार पाडतच राहीन, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.