उल्हासनगर महापालिकेत राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:45 PM2019-12-16T23:45:24+5:302019-12-16T23:45:42+5:30
फोटो पायाखाली तुडवला : भाजप नगरसेवकांचा धिंगाणा
उल्हासनगर : महापालिकेत सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्याच महासभेत, सोमवारी भाजप नगरसेवकांनी धिंगाणा घालत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यांचा फोटो पायदळी तुडवत, सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महासभा सुरू होताच भाजपचे गटनेते जमनुदास पुरस्वानी, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी आदींनी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. नगरसेवकांनी गांधी यांचा फोटो झळकवत, तो पायदळीही तुडवला. राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यानंतर, वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठराव भाजपने मंजूर केला. याप्रकरणी राहुल गांधी यांची निंदा करणाऱ्या ठरावावर भाजप सोडून सर्व पक्षांचे नगरसेवक तटस्थ राहिले.
सिंधीबांधवांचे श्रद्धास्थान असलेले स्वामी शांतिप्रकाश आश्रम, साई वसनसाई दरबार तसेच हिराघाट येथील थायरा सिंग दरबार आदींना तीर्थस्थळाचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. प्रशासकीय ठरावानुसार मनीष हिवरे व नितेश रंगानी यांना सहायक उपायुक्त म्हणून पदोन्नती देण्यास मंजुरी देण्यात आली. शिक्षण मंडळाची रेनकोट देण्याची निविदा यावेळी रद्द करण्यात आली.
शिवसेनेचे स्वप्नील बागुल व कुलवंतसिंग सहातो यांनी पालिका जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांची उपायुक्तपदी नियुक्त करण्याचा ठराव आणला होता. या ठरावाला मंजुरी देण्यात आली.
जुन्याच महासभेचे
चालले कामकाज
यापूर्वीच्या स्थगित झालेल्या महासभेचे कामकाज सायंकाळपर्यंत सुरू होते. महासभेचे नियमित विषय सायंकाळपर्यंत चर्चेला आले नाही. आता डिसेंबर महिन्याच्या शेवटी महापौर महासभा बोलावण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपचे संख्याबळ जास्त असताना ओमी समर्थक नगरसेवकांमुळे शिवसेनेचा महापौर, तर रिपाइंचा उपमहापौर निवडून आला आहे.
मूलभूत समस्यांचा विसर
शहरात पाणीटंचाई, रस्ते दुरवस्था, साफसफाई, आरोग्य, मालमत्ताकर विभागातील अनियमितता, नगरविकास विभागाचे काम ठप्प, शहर विकासकामे, आरोग्य, अवैध बांधकामे, राज्य शासन अध्यादेशाद्वारे बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला अल्पप्रतिसाद आदी मूलभूत विषयांचा बहुंताश नगरसेवकांना विसर पडल्याचे चित्र यानिमित्ताने महासभेत निर्माण झाले होते.