उल्हासनगरच्या बाजारपेठेस लागली उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:13 AM2018-10-15T00:13:46+5:302018-10-15T00:14:08+5:30

उत्पन्नाच्या नावाने आधीच बोंब असलेल्या उल्हासनगर पालिकेला विविध बाजारपेठांमधून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत असले, तरी व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नसल्याने येथील व्यापारी नाराज आहेत. बाजारपेठांकडून पालिकेस घसघशीत उत्त्पन्न मिळत असल्याने, पालिकेने शहराबरोबरच येथील बाजारपेठांचाही विकास करायला हवा, अशी भावना येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

The decline of Ulhasnagar market started | उल्हासनगरच्या बाजारपेठेस लागली उतरती कळा

उल्हासनगरच्या बाजारपेठेस लागली उतरती कळा

googlenewsNext

शहराची ओळख ही तेथील रस्ते, वास्तू आणि पदार्थांवरूनही प्रसिद्ध होते. फळे, फुलांच्या वैशिष्ट्यावरूनही ती कोणत्या शहरातील आहेत हे कळून येते. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर उल्हासनगर शहर वसले आहे. कोणतीही डुप्लिकेट वस्तू हवी असल्यास ती उल्हासनगरमध्ये हमखास मिळते. शहरातील जीन्स, फर्निचर, बॅग, गाऊन, जपानी, इलेक्ट्रॉनिक साहित्य आदींच्या मार्केटमुळे उल्हासनगरचे नाव राज्यातच नव्हे, तर देशात प्रसिध्द झाले आहे.

कोट्यवधींची उलाढाल होत असलेल्या मार्केटला शेवटची घरघर लागते की काय, अशी परिस्थिती दिसत आहे. महापालिका मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून देत नसल्याने व्यापारी त्रस्त झाले आहेत. महाालिकेसह राज्य सरकारने या मुद्याची वेळीच दखल घेतली नाही, तर हे औद्योगिक शहर भकास व्हायला वेळ लागणार नाही, अशी भिती व्यापाºयांनी व्यक्त केली.


फाळणीच्यावेळी सिंध प्रांतातील विस्थापित झालेल्या बहुसंख्य सिंधी समाजाला देशाच्या विविध ठिकाणी वसविण्यात आले. त्यापैकी एक लाख सिंधी बांधवांना कल्याण शहराजवळील ब्रिटीश लष्करी छावणीतील बराक, ब्लॉक व खुल्या जागेत वसविण्यात आले. व्यापारी म्हणून ओळख असलेल्या सिंधी समाजाला पुन्हा स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, यासाठी केंद्र सरकारने कॅम्प नं-४ संतोषनगर येथे आयटीआय सुरू केले. हजारो सिंधी बांधवांनी येथे व्यवसायाचे धडे गिरविले. कालांतराने सिंधी बांधव पूर्णत: व्यवसायाकडे वळल्यावर मुलांच्या संख्येअभावी आयटीआय संस्था बंद करण्याची वेळ सरकारवर आली. आजच्या स्थितीत चार एकरची आयटीआयची जागा पडून असून चारही बाजूंनी अतिक्रमण होत आहे.


सुरूवातीला मुंबईला जावून लहान-मोठा तसेच रेल्वेत गोळया, पापड विक्रीचा व्यवसाय करणाºया सिंधी बांधवांनी सर्वच क्षेत्रात भरारी घेतली. बांधकाम, चित्रपट, व्यवसाय, हॉटेल, कापड, शेअर मार्केट अशा अनेक क्षेत्रात भरारी घेवून देशाच्या कानाकोपºयासह मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह परदेशात अनेक जण स्थायिक झाले. मात्र त्यांची उल्हासनगरबद्दलची ओढ आताही कायम आहे. जे काही दिले ते उल्हासनगरने दिले, अशी त्यांची धारणा असून, चेट्रीचंड्र व चालिया उत्सवाला देश-विदेशातील लाखो सिंधी बांधव दर्शनासाठी व उत्सवात सहभागी होण्यासाठी शहरात येतात.


जगभरातील कोणत्याही नव्या वस्तूची हुबेहूब प्रतिकृती शहरात मिळत असून, कमी किमतीत उत्तम दर्जा मिळतो. येथील सिंधी व्यापाºयांनी संंघटनेची स्थापना करून ‘यूएसए’ नावाच्या ब्रँडने वस्तूची विक्री केली. ‘यूएसए’ च्या नावाने कमी किंमतीत वस्तू मिळत असल्याने, नागरिकांना या वस्तूंनी भूरळ घातली. अशा नानाविविध रंगांनी रंगलेल्या व सजलेल्या उल्हासनगरबद्दल सर्वांच्या मनात आकर्षण निर्माण झाले.


रक्तरंजित राजकारण असो, की व्यवसाय असो, यामध्ये सिंधी बांधवांनी स्वत:चा दबदबा निर्माण केला. जीन्स पॅन्टची फॅशन येताच, येथे देशातील दोन नंबरचे विनापरवाना मार्केट उभे राहिले. शहराच्या मध्यवर्ती भागात प्रसिध्द जपानी कापड असून, शहरात तयार होणाºया कपड्याला देशभरात मागणी आहे. कॅम्प नं-२ परिसरात फर्निचर मार्केटची शेकडो दुकाने आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, वसई-विरार, पालघर, नाशिक आदी ठिकाणाहून शेकडो नागरिक फर्निचरच्या वस्तू घेण्यासाठी येथे येतात. कॅम्प नं-५ मध्ये गाऊन मार्केट तर कॅम्प नं-३ परिसरात इलेक्ट्रॉनिक मार्केट प्रसिध्द आहे. देशात कुठेही न मिळणाºया वस्तू येथे मिळतात, असी येथील मार्केटची ख्याती आहे. पवई चौक येथे बॅग मार्केट असून, शाळेच्या बॅगेसह नोकरदार महिला व नागरिकांसाठीच्या दैनंदिन बॅग तसेच प्रवासी बॅग येथे तयार होतात.

फर्निचर मार्केटमधील समस्या कायम
कॅम्प नं-३ परिसरातील शिवाजी चौक ते नेहरू चौकदरम्यान फर्निचर मार्केट प्रसिध्द आहे. उत्तम सागाच्या लाकडापासून बनविण्यात आलेले सोफे, खुर्च्या, कपाटे आदींसह इतर वस्तू येथे मिळतात. त्याचप्रमाणे चिनी मार्केटमधील फर्निचर येथे विक्रीला असल्याने नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, डोंबिवली, कल्याण, कर्जत, नाशिक, पुणे, नगर यासह राज्यभरात येथील फर्निचरला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ४०० पेक्षा जास्त फर्निचरची दुकाने असून दहा हजारापेक्षा जास्त कामगार येथे काम करतात. या फर्निचर मार्केटमधील समस्या ऐकून घेण्यासाठी तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह सर्वच पक्षाचे वरिष्ठ नेते येवून गेले. मात्र मार्केटमध्ये काहीही बदल झाला नाही.

बॅग उद्योग भरभराटीस

  • कॅम्प नं-३ पवई चौक परिसरात बॅग उद्योग भरभराटीस आला असून दुकानांची संख्या एक हजारापेक्षा अधिक आहे. शाळेच्या दप्तरासह प्रवासी बॅग तसेच नोकरी करणाºया महिला व पुरूषांसाठी विविध प्रकारच्या बॅगेचा पुरवठा येथून देशभरात केला जातो. स्वस्त, टिकावू व रास्त किंमतीला असणाºया बॅगांना देशभरातून मोठी मागणी आहे.
  • बॅग मार्केटही लहान-मोठया व्यापारी गाळ्यात थाटले असून, महापालिकेने या मार्केटकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. याच परिसरात रिलायन्स मार्केट हब, तसेच विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन परिसरात सरकारने बांधलेली शेकडो व्यापारी संकुल गाळे आहेत. महापालिकेने बॅग हब मार्केट उभारल्यास व्यवसायात वाढ होवून महापालिकेला उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.

Web Title: The decline of Ulhasnagar market started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.