डेकोरेटिव्ह घरगुती पणत्या बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:59 PM2018-11-02T23:59:22+5:302018-11-02T23:59:40+5:30
नव्याने आले अॅक्रेलिकचे मोर; मोत्यांचे झुंबर वेधताहेत लक्ष
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : यंदा ठाणेकरांची घरे डेकोरेटिव्ह पणत्यांनी उजळणार आहे. घरगुती वस्तूंपासून तयार केलेल्या आकर्षक पणत्या विक्रीसाठी आल्या आहेत. अॅक्रेलिक मोराची पणती नव्याने आली असून मोत्यांचे झुंबरदेखील ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. हे झुंबर कंदील म्हणून वापरता येतात.
सध्या डेकोरेटिव्ह पणत्यांचा बोलबाला आहे. मोत्यांचे झुंबर १२०० रुपयांप्रमाणे आहे. एलईडी कंदीलही वेगळ्या प्रकारात पाहायला मिळत असून याची किंमत ६०० रुपये आहे. सीडी, बांगडी, केकच्या बेसला असलेली डीश, स्पंज वापरून डेकोरेटिव्ह पणत्या तयार करण्यात आल्या आहेत.
पाण्यावर तरंगणाऱ्या पणत्याही विविध आकारांत, रंगांत आल्या आहेत. फ्लोटिंग कुंदन कॅण्डल्स तसेच मेणाच्या पणत्यांमध्ये गुलाब, बदक, शेवंती, कमळ आदी प्रकार उपलब्ध असून दिवा म्हणून वापरण्यात येणारे मोत्यांचे कलश पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे बोरोसिलिकेटच्या पणत्या, सिल्व्हर कोटेड दिवेदेखील उपलब्ध आहेत. पणत्यांबरोबर घर सजवण्यासाठी मोत्यांची तोरणे, हॅण्डमेड लटकन, प्लास्टिकची झेंडूची फुले, माळा, डायनिंग टेबलवर ठेवण्याची डेकोरेटिव्ह प्लेट, अॅक्रेलिक व एमडीएफ लाकडाच्या व मोतीने सजवलेल्या रांगोळ्या, दिवाळीसाठी खास कॅन्व्हॉसची तोरणेदेखील आली असल्याचे वैशाली जांब्रे यांनी लोकमतला सांगितले.
डेकोरेटिव्ह पणत्यांना प्रतिसाद चांगला मिळत आहे. यंदा मी नव्याने अॅक्रेलिक मोर पणती तयार केली आहे. या कामात माझे पती जयंत जांब्रे यांचे मोलाचे सहकार्य मिळते. - वैशाली जांब्रे