लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांत घट; पण निर्बंध शिथिल होताच ‘उच्छाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:00+5:302021-09-27T04:44:00+5:30

प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील गुन्ह्यांचे स्वरूप पाहता त्यात घरफोडी, चोरी, हाणामारी, सोनसाखळी चोरी, ...

Decrease in crime in lockdown; But as soon as the restrictions are relaxed, | लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांत घट; पण निर्बंध शिथिल होताच ‘उच्छाद’

लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांत घट; पण निर्बंध शिथिल होताच ‘उच्छाद’

Next

प्रशांत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरातील गुन्ह्यांचे स्वरूप पाहता त्यात घरफोडी, चोरी, हाणामारी, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, ऑनलाइन फसवणूक यासारख्या गुन्ह्यांची नोंद जवळपास रोजच येथील पोलीस ठाण्यात होते. वाहनचोरी आणि ऑनलाइनच्या माध्यमातून फसवणूक वगळता प्रतिदिन घडणाऱ्या गुन्ह्यांच्या या घटनांत लॉकडाऊनमध्ये कमालीची घट झाली आहे. वाहनचोरीचे सत्र लॉकडाऊनप्रमाणे अनलॉकमध्येही सर्रास सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शिथिल झालेल्या निर्बंधांमुळे घरफोडी, चोऱ्या, हाणामाऱ्या, फसवणूक आदी घटनांनी उच्छाद मांडला आहे. हे गुन्हे उघडकीस येऊन, तसेच आरोपी जेरबंद होऊनही गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे.

कल्याण परिमंडळ ३ परिक्षेत्रात आठ पोलीस ठाणी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातही लॉकडाऊन सुरू झाले. मार्चमध्ये सुरू झालेले लॉकडाऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होते. महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सप्टेंबर २०२० ला सुरू असलेल्या अनलॉक ४ मध्येही ४४ कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम ठेवले होते. प्रारंभी लागू झालेली संचारबंदी पाहता त्यावेळेस पोलिसांची गस्त जागोजागी दिसत होती. चौकाचौकांमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे इतर गुन्ह्यांत घट होऊन केवळ संचारबंदीचे उल्लंघन करण्यासंदर्भातले गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक होते. लॉकडाऊनमध्ये नागरिक घरातच राहिल्याने घरफोडी, जबरी चोरी, हाणामारी, सोनसाखळी चोरी या गुन्ह्यांना चांगलाच चाप बसला होता, तर वाहनचोरीच्या घटना सुरू होत्या. मार्च ते ऑगस्ट २०२० या सहा महिन्यांत ६८ वाहनांची चोरी झाली होती. यात दुचाकींसह रिक्षा आणि कारसारख्या चारचाकी वाहनांचाही समावेश होता. या चोरीच्या घटनांचे सत्र अजून सुरूच आहे. या वाढत्या चोऱ्या पोलीस यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत. लॉकडाऊनप्रमाणेच उठविलेल्या निर्बंधांतही वाहन चोरांचा धुमाकूळ सुरू असल्याचे दिसत आहे.

--------------------------------------------------

इतर गुन्ह्यांत वाढ

सध्या बंद घरे व दुकानांचे शटर उचकटून मुद्देमाल लंपास करणे, सोनसाखळी चोरी, हातचलाखी, वाहनचोरी, मोबाइल चोरी, घरात घुसून मुद्देमाल लुटणे, हनी ट्रॅप, ऑनलाइन फसवणूक, हल्ला करून पैसे आणि मोबाइल लुबाडणे आदी प्रकार घडत आहेत. डिसेंबरमध्ये एका जवाहिराच्या दुकानात भरदिवसा शस्त्राच्या धाकाने चोरीचा प्रकार घडला होता. आडिवलीत तीन दिवसांत ११ घरफाेड्या झाल्या होत्या. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये पोलिसांची दिवस-रात्र गस्त होती. अनलॉक आणि निर्बंध उठल्यानंतर पोलिसांची गस्त कमी झाली का, अशी शंका गुन्ह्यांच्या वाढत्या आलेखावरून उपस्थित होत आहे.

------------------------------------------------------

Web Title: Decrease in crime in lockdown; But as soon as the restrictions are relaxed,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.