डेंग्यूसह मलेरियाच्या रुग्णसंख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:32 AM2020-11-24T00:32:08+5:302020-11-24T00:32:32+5:30
कोरोनाचा परिणाम : नागरिकांत आरोग्याविषयी वाढली जागरुकता
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील सहा ते सात महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र, अशातच दरवर्षी पावसाळ्यात व उन्हाळ्याच्या कालावधीत उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनासोबतच डेंग्यू, मलेरिया रोखण्यासाठी राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यामध्ये डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण कमी आढळले आहेत. कोरोनामुळे नागरिकांत आलेल्या जागरूकतेमुळे त्यात मोलाची साथ लाभत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अहोरात्र झटत आहे. अशातच नागरिकांनीदेखील या आजाराचा धसका घेऊन स्वच्छतेवर दिलेला भर दिल्याचे दिसून आहे. त्यात कोरोना संसर्गाबरोबर आरोग्य विभागाने यंदाच्या वर्षी डेंग्यू, मलेरिया या रोगांवरही नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. परिणामी, यंदा या रुग्णांच्या संख्येत घट झालेली दिसत आहे. जिल्हा रुग्णालयात सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे ३०५ आणि डेंग्यूचे २११ रुग्ण आढळले होते, तर ऑक्टोबर महिन्यात या रुग्णसंख्येत घट झाली असून मलेरियाचे २१२ आणि १७७ रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. अंबरनाथ, बदलापूर शहरांत सप्टेंबर महिन्यात ३८४ रुग्ण मलेरियाचे आणि तीन रुग्ण डेंग्यूचे आढळले होते. ऑक्टोबर महिन्यात मलेरियाचे ३६५ रुग्ण आणि डेंग्यूचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे यंदा काेरोनाला नियंत्रणात आणताना आरोग्य विभागाला डेंग्यू आणि मलेरियाची साथ रोखण्यास यश मिळाले आहे.
यासंदर्भात ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना विचारले असता, कोरोना विषाणूच्या भीतीमुळे नागरिक कमालीचे सावध झाले असून खबरदारी म्हणून ते स्वतःच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेत असल्यामुळेच यंदा डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येतही लक्षणीय घट झाली आहे.
लेप्टोचेही रुग्ण आढळले
जिल्ह्यात शहरी भागात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये घट होत असली, तरी ग्रामीण भागात मात्र डेंग्यू आणि मलेरियासोबतच लेप्टोच्या आजाराने डोके वर काढले आहे. मुरबाडमध्ये मागील काही दिवसांंत सहा जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर, शहापूर तालुक्यात १० जणांना डेंग्यू, दोन जणांना लेप्टो तर दोन मलेरियाचे रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण
आजार सप्टेंबर ऑक्टोबर
डेंग्यू २१५ १७९
मलेरिया ६८९ ५७७