जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत घट; मृत्युदरही शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:59 PM2020-12-16T23:59:43+5:302020-12-16T23:59:51+5:30
कोरोना काळात ठरली दिलासादायक बाब
- सुनील घरत
पारोळ : पालघर जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले असताना, डेंग्यूसारख्या रुग्णांची संख्या या वर्षी जिल्ह्यात कमी झाल्याचे आणि मृत्युदरही शून्यावर आल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासा देणारी बाब ठरली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाबरोबर डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असताना, पालघर जिल्ह्यात डेंग्यूच्या तापाचे प्रमाण कमी आहे. डेंग्यू हा एडीस् इजिटी या डासापासून होतो. डेंग्यू तापाकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. या वर्षी जिल्ह्यात केवळ ४५ रुग्ण आढळून आले असून, एकाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूची भीती कमी झाली आहे. विशेष म्हणजे, वसई-विरार शहर महापालिकेतही या वर्षी डेंग्यूच्या रुग्णांची नोंद कमी झाली आहे, तर वसई, जव्हार, तलासरी या तालुक्यात डेंग्यूचा दर शून्यावर आहे.
पालघर जिल्हा अजूनही कोरोनातून भयमुक्त झालेला नाही. मात्र, डेंग्यूची भीती कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप विभागाकडून मोठ्या प्रमाणात डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून डेंग्यूच्या निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम आयोजित करून, त्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात सन २०१९ मध्ये डेंग्यूचे २७१ रुग्ण आढळले होते. मात्र, आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांवर वेळीच उपचार केल्याने एकही रुग्ण दगावला नव्हता. त्यानंतर, चालू वर्षात जानेवारी, २०२० पासून जिल्ह्यात केवळ ४५ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे.
खासगी रूग्णालयांतूनही
डेंग्यू रूग्णांची मिळते माहिती
खासगी रुग्णालयांनामध्येही डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाला माहिती कळविण्यात येते. जिल्ह्यातील तालुक्यानुसार रुग्णसंख्या पालघर-४, डहाणू-१८, वाडा-१०, मोखाडा-५, वसई-विरार महापालिका-७ रुग्ण. वसई, तलासरी, जव्हार तालुक्यांमध्ये एकही डेंग्यूचा रुग्ण नाही.
डेंग्यूची लक्षणे
अचानक जोराचा ताप येणे. डोक्याचा पुढचा भाग खूप दुखणे. डोळ्याच्या मागील भागात वेदना होणे. स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना होणे. छाती आणि त्यावर गोवरासारखे पुरळ येणे. मळमळणे आणि उलट्या होणे. त्वचेवर वृण उठणे.
जिल्ह्यात डास निर्मूलनाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून खासगी रुग्णालयांनाही सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास तत्काळ आरोग्य विभागाला रुग्णाबद्दल माहिती कळविण्यात येते.
- सागर पाटील, हिवताप अधिकारी, पालघर जिल्हा