कोरोनाच्या संसर्गामुळे दिड दिवसांच्या गणेश मूर्तींच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 08:22 PM2020-08-24T20:22:26+5:302020-08-24T20:22:31+5:30
मीरा भाईंदर महापालिकेने यंदा कोरोनाचा संसर्ग पाहता शहरातील विसर्जन स्थळे बंद करून ५२ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली.
मीरारोड - कोरोनाच्या संसर्गा मुळे यंदा दिड दिवसांच्या गणेश मुर्त्यांची संख्या खूपच कमी झाली आहे . त्यातच बहुतांश भाविकांनी मातीच्या पर्यावरणपूरक मुर्त्या आणत घरात वा परिसरातच कृत्रिम तलाव करून मुर्त्या विसर्जन केल्या आहेत . कारण गेल्या वर्षी मीरा भाईंदर मध्ये दिड दिवसांच्या विसर्जन केलेल्या घरगुती गणेश मुर्त्यांची संख्या ९ हजार ३८१ इतकी होती . यंदा मात्र दीड दिवसांच्या ३ हजार ८७६ गणेश मूर्तीच विसर्जना साठी महापालिकेच्या मूर्ती स्वीकृती केंद्र व विसर्जन ठिकाणी आल्या.
मीरा भाईंदर महापालिकेने यंदा कोरोनाचा संसर्ग पाहता शहरातील विसर्जन स्थळे बंद करून ५२ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली. मिरवणुका आदी सर्व बंद केल्याने यंदा कुठेही रस्ते जाम झालेले नव्हते . बहुतांश भाविकांनी जागरूकता दाखवत मातीच्या लहान मुर्त्या आणल्या . विसर्जन देखील घरातच करण्याचे प्रमाण यंदा वाढले . महत्वाचे म्हणजे अनेक मंडळ , शिवसेना आदींच्या वतीने स्वतःच पुढाकार घेऊन कृत्रिम तलाव निर्माण केले होते . त्यामुळे अनेकांनी आपल्या परिसरातील या कृत्रिम तलावांना पसंती दिली.
गेल्या वर्षी मीरा भाईंदर मध्ये दिड दिवसाच्या ९ हजार ३८१ घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते . यंदा मात्र शहरात पालिका विसर्जन स्थळी दीड दिवसांच्या केवळ ३ हजार ८७६ गणेश मूर्तीच आल्याची माहिती पालिकेने दिली आहे .
सार्वजनिक मंडळांनी देखील कोरोना संसर्गा मुळे जबाबदारीची भूमिका घेतली आहे . गेल्या वर्षी दिड दिवसांच्या २९ सार्वजनिक गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले होते . यंदा मात्र १६४ सार्वजनिक गणेश मुर्त्यांचे विसर्जन झालेले आहे . यातून अनेक सार्वजनिक मंडळांनी देखील दिड दिवसांचाच गणपती ठेवला होता . मंडळांनी लहान मंडप , कमी आकाराची मूर्ती आणि साधा देखावा अशी सामंजस्याची भूमिका घेतली . काही मंडळांनी तर परिसरातच कृत्रिम तलाव उभारून त्यात मूर्ती विसर्जन केली .