प्रभागांमध्ये होणारी घट प्रस्थापितांच्या पथ्यावर; बदलामुळे नव्याने होणार प्रभागरचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:19 AM2020-07-20T00:19:26+5:302020-07-20T00:21:05+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका
- प्रशांत माने
कल्याण : केडीएमसीतील २७ गावांमधील १८ गावे वगळल्याने प्रभागांची संख्या आता १२२ वरून ११८ झाली आहे. या बदलामुळे नव्याने प्रभागरचना होणार आहे. चार प्रभाग कमी झाल्याने त्यातील सर्वसाधारण गटातील दोन, अनुसूचित जातीची एक आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग गटातील एक अशा चार जागाही कमी होणार आहेत. आरक्षणाच्या रचनेत प्रस्थापितांची चांगलीच कोंडी होणार होती; पण बदलामुळे प्रभागांची झालेली घट त्यांच्या पथ्यावर पडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
२७ गावांपैकी १८ गावे वगळल्याची आणि नऊ गावे केडीएमसीत राहतील, याबाबतची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर महापालिकेत आता ११८ प्रभाग राहतील. यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. प्रभागरचनेचे काम सुरू करा, असे निर्देशही दिले आहेत. २०१५ च्या निवडणुकीत महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १५ लाख १८ हजार ७६२ इतकी होती. यात अनुसूचित जातीमधील लोकसंख्या एक लाख ५० हजार १७१ तर अनुसूचित जमातीची ४२ हजार ५८४ इतकी लोकसंख्या होती. एकूण १२२ प्रभाग होते. यात ५० टक्के महिलांसाठी राखीव जागा याप्रमाणे ६१ जागा होत्या.
सर्वसाधारण गटासाठी असलेल्या ७४ जागांपैकी ३६ जागा या महिलांसाठी होत्या. अनुसूचित जाती वर्गासाठी १२ जागा होत्या. यातील सहा जागा महिलांसाठी होत्या. अनुसूचित जमाती वर्गासाठी तीन जागा होत्या. यातील दोन जागा महिलांसाठी राखीव होत्या. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग गटासाठी ३३ जागा होत्या. यातील १७ जागा महिलांसाठी होत्या. आता नव्या रचनेत १८ गावे वगळल्याने महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येतही घट झाली आहे. बदलानुसार आता १३ लाख ३७ हजार ६८१ इतकी लोकसंख्या आहे.
अनुसूचित जातीमधील नागरिकांची संख्या एक लाख २८ हजार १०७ इतकी आहे, तर अनुसूचित जमातीमधील संख्या ३८ हजार ४१८ एवढी राहिली आहे. १२२ वरून प्रभागांची संख्या ११८ इतकी झाली आहे. ११८ पैकी ५९ जागा या महिलांसाठी राखीव असतील.
सर्वसाधारण गटातील दोन जागा कमी
सर्वसाधारण गटातील दोन जागा कमी झाल्या असून आता ७२ जागांपैकी ३५ जागांवर महिला सदस्य असतील. अनुसूचित जाती वर्गातील एक जागा कमी झाली आहे. यातील ११ जागांपैकी सहा जागांवर महिला असतील. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातीलही एक जागा कमी झाली आहे. नव्याने होणाऱ्या रचनेत ३२ पैकी १६ जागा महिलांसाठी राहतील. अनुसूचित जमाती वर्गातील जागेत कोणताही बदल झालेला नाही. यातील तीन जागा ‘जैसे थे’ असून यातील दोन जागा त्या वर्गातील महिलांसाठी राखीव असतील.