तीन दिवसांत उभारलेल्या भाईंदरच्या ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पाचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 01:56 PM2021-05-18T13:56:41+5:302021-05-18T13:59:29+5:30

तीन दिवसात उभारलेल्या भाईंदरच्या ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पाचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण 

Dedication of Bhayander's Oxygen Production Project at the hands of Eknath Shinde | तीन दिवसांत उभारलेल्या भाईंदरच्या ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पाचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण 

तीन दिवसांत उभारलेल्या भाईंदरच्या ऑक्सिजन उत्पादन प्रकल्पाचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण 

Next

मीरारोड - भाईंदर येथे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन (Oxygen) उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील लहान मुलांसाठीच्या कोरोना उपचार वॉर्डची पाहणी करून उपाय योजनांचा आढावा शिंदे यांनी घेतला. 

ठाण्यातील पार्कींग प्लाझा कोविड केअर सेंटरमध्ये १० दिवसांत ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारणाऱ्या एअर सिप कंपनीने यावेळी भाईंदरमध्ये अवघ्या तीन दिवसांत हा प्रकल्प उभारला आहे. ह्या प्रकल्पातून दररोज १७५ जंबो सिलेंडर क्षमतेचा ऑक्सिजन तयार होईल. तो रोज ११० रुग्णांना थेट पाईपलाईन द्वारे पुरवला जाईल. ह्या प्रकल्पातून वातावरणातून हवा शोषून घेऊन त्यामधून नायट्रोजन बाहेर काढून ९३ टक्के शुद्ध ऑक्सिजन तयार केला जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.

यावेळी खासदार राजन विचारे, पोलीस आयुक्त सदानंद दाते, आमदार गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त संभाजी वाघमारे, सभागृह नेते प्रशांत दळवी, विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर , नगरसेवक राजू भोईर, जोशी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक गीते आदी उपस्थित होते.   

संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्ग होण्याच्या पार्श्वभूमीवर विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये बालरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जोशी रुग्णालयात कोरोना बाधित लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड तयार करण्यात आला आहे. कोरोना विषाणूची सध्यस्थिती पाहता प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबतच, पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष करता येणार नसून त्यासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे शिंदे यांनी निर्देश दिले. 

जोशी रुग्णालयात २१० ऑक्सिजन खाटा व ४० आयसीयू खाटा आहेत. सद्यस्थितीत ६ केएल क्षमतेचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टॅंक व ३५२ जम्बो सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे. सदर प्लांट हा स्वयंचलित असल्याने यासाठी मनुष्यबळाचा वापर अगदी कमी होतो. तसेच, मेडिकल लिक्विड ऑक्सिजन टॅंक रिफिलिंग करताना व जम्बो सिलेंडर्स हाताळणी करताना होणारे अपघात या प्लांटमध्ये होत नाहीत, अशी माहिती आयुक्त ढोले यांनी दिली. 

'म्युकर मायकोसिस' चा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत असल्याने या त्यासाठीचा औषधसाठा तसेच तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून आवश्यक तयारी केली आहे. म्युकरमायकोसिसाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होईल. 
महानगरपालिकेच्या सर्व ८ कोविड रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल ऑडिट पूर्ण झाले आहे . तर खाजगी ४७ रुग्णालयांचे फायर व थर्ड पार्टी ऑक्सिजन ऑडिटचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती आयुक्त ढोले यांनी पालकमंत्र्यांना दिली. 

Web Title: Dedication of Bhayander's Oxygen Production Project at the hands of Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.