ठाणे शहर पोलिसांच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:08 AM2021-08-12T00:08:56+5:302021-08-12T00:15:19+5:30
अंध व्यक्तींनाही स्क्रीम रिडर या सॉफ्टवेअरच्या मदतीने हे संकेतस्थळ सहजपणे हाताळता येणार आहे. हरविले आणि सापडले या अंतर्गत अगदी टॅबवरुनही अति महत्वाच्या वस्तू हरविल्याची आणि सापडल्याची माहितीही पोलिसांना घरबसल्या तात्काळ देता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एखादी तक्रार करण्यासाठी थेट पोलीस ठाण्यात जाण्याऐवजी अगदी घरबसल्याही आता मोबाईलद्वारे ठाणेपोलिसांच्या नविन संकेतस्थळावरुन तक्रार करता येणार आहे. इंग्रजी बरोबरच मराठीचाही वापर असलेल्या अद्ययावत अशा ठाणे शहर पोलिसांच्या नविन संकेतस्थळाचे लोकार्पण पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी नुकतेच केले आहे.
डब्ल्यू डब्ल्यू डॉट ठाणेपोलीस डॉट जीओव्ही डॉट इन हे संकेतस्थळ आधुनिक तंत्रज्ञान वापरुन तयार केले आहे. ते मोबाईल, टॅब, आयपॅडसारख्या उपकरणांमध्येही सहजपणे चालू करता येणार आहे. यामध्ये सायबर सुरक्षेवर विशेष भर दिलेला आहे. यामध्ये माहितीचा अधिकार, पोलीस भरतीविषयक माहिती, पोलीस विभागांच्या विविध उपक्रमांच्या माहितीचाही त्यामध्ये समावेश आहे. या संकेतस्थळाद्वारे नागरिकांना तक्रार, गोपनीय माहिती देण्याचीही सुविधा उपलब्ध केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय, यामध्ये सिटीजन अलर्ट वॉलवर पोलिसांनी टाकलेली माहितीही नागरिकांना सहज पाहता येणार आहे. नव्या वेबसाईटवर ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, कार्यालय तसेच पोलीस ठाण्यांच्या संपर्क क्रमांकासह जवळच्या पोलीस ठाण्याची माहितीही तात्काळ उपलब्ध होणार आहे.
* अंध व्यक्तींनाही स्क्रीम रिडर या सॉफ्टवेअरच्या मदतीने हे संकेतस्थळ सहजपणे हाताळता येणार आहे. हरविले आणि सापडले या अंतर्गत अगदी टॅबवरुनही अति महत्वाच्या वस्तू हरविल्याची आणि सापडल्याची माहितीही पोलिसांना घरबसल्या तात्काळ देता येणार आहे.
‘‘ ठाणे शहर पोलिसांच्या या वेबसाईटवर आवश्यक अशी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ही नूतणीकरण केलेली वेबसाईट निश्चितच उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलीस संबंधी कामकाजासाठी या संकेतस्थळाचा वापर करावा.’’
लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर