उल्हासनगरमध्ये पालिकेच्या अत्याधुनिक लॅबचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:15 AM2021-01-06T00:15:19+5:302021-01-06T00:15:26+5:30

कोरोनाची होणार चाचणी : २४ तास राहणार सुरू, नागरिकांना दिलासा

Dedication of state-of-the-art lab of the municipality at Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये पालिकेच्या अत्याधुनिक लॅबचे लोकार्पण

उल्हासनगरमध्ये पालिकेच्या अत्याधुनिक लॅबचे लोकार्पण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
उल्हासनगर : शहरात उभारलेल्या अत्याधुनिक लॅबचे महापौर-उपमहापौरांच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. यात कोरोनाची चाचणी करण्यात येणार असून लॅब २४ तास सुरू राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे यांनी दिली.


ऐन कोरोना काळात उभी राहिलेली ही लॅब उद्घाटनाअभावी काही महिन्यांपासून धूळखात होती. मनसेने याबाबत आवाज उठवून नागरिकांच्या सेवेसाठी लॅबचे तात्पुरत्या स्वरूपात उद्घाटन केले होते. मनसेच्या आंदोलनाने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे डोळे उघडले. अखेर लॅबचे उद्घाटन करण्याचा घाट सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर यांच्याकडे घातला. आयुक्त डॉ. राजा दयानिधी सोमवारी सुट्टीवरून परत आल्यावर महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव यांनी कोणार्क रेसिडन्स येथे उभारण्यात आलेल्या लॅबच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरविला. उद्घाटनाला आमदार कुमार आयलानी, आयुक्त डॉ. दयानिधी, सभागृह नेते भरत गंगोत्री, स्थायी समिती सभापती विजय पाटील, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त मदन सोंडे आदी उपस्थित होते.


लॅबमध्ये सध्या कोरोना चाचणी होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच अन्य रोगांच्या चाचण्या लवकरच सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर उपमहापौर भालेराव यांनी गोरगरीब व गरजूंसाठी मोफत कोरोना चाचणीशिवाय मलेरिया, डेंग्यू, रक्ताच्या विविध चाचण्या लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.  त्यासाठी महापालिका अर्थसंकल्पात तरतूद केल्याची आठवण आयुक्तांना करून दिली. तसेच एक ते दीड वर्षात महापालिकेचे अत्याधुनिक रुग्णालय उभे राहणार असल्याचे सांगून रिजन्सी येथे जागेची पाहणी झाल्याची माहिती यावेळी दिली. या लॅबमुळे नागरिकांना अन्य ठिकाणी जावे लागणार नाही अशी माहिती या वेळी पालिका सूत्रांकडून देण्यात आली.

लॅबचे बांधकाम वादात
महापालिकेने लॅब उभारणीसाठी सहा लाखांची तरतूद केली असताना विनानिविदा व मंजुरीविना ४५ लाखांपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप शहर मनसेने केला आहे. याबाबत चौकशी झाल्यास मोठा घोटाळा बाहेर पडेल अशी प्रतिक्रिया मनसेचे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली. तसेच लॅब उभारली ती जागा महापालिकेच्या मालकीची व बांधकाम कामाला परवानगी आहे का? असा प्रश्नही विचारला जात आहे.

Web Title: Dedication of state-of-the-art lab of the municipality at Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.