दुर्गाडी खाडीवरील नव्या पुलाच्या दोन लेनचे सोमवारी लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:24+5:302021-05-29T04:29:24+5:30
कल्याण : भिवंडी-कल्याण रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या सहापदरी पुलापैकी दोन लेनचे काम पूर्ण झाले आहे. या ...
कल्याण : भिवंडी-कल्याण रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवरील नव्याने उभारण्यात येत असलेल्या सहापदरी पुलापैकी दोन लेनचे काम पूर्ण झाले आहे. या दोन लेनचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ३१ मे रोजी करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शुक्रवारी दिली. दोन लेनच्या अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी केल्यानंतर ते बोलत हाेते.
याप्रसंगी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी रवींद्र कपोते, शरद पाटील, प्रभुनाथ भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. भिवंडी-कल्याण-शीळ मार्गावरील दुर्गाडी खाडीवरील दोन लेनचा पूल हा वाहतुकीसाठी अपुरा पडत होता. त्या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होती. ती दूर करण्यासाठी खाडीवर सहापदरी पूल तयार करण्यास मंजुरी देण्यात आली होती. या पुलाचे काम २०१६ रोजी सुरू केले. मात्र, नेमलेल्या कंत्राटदाराने संथगतीने काम सुरू असल्याने ते त्याच्याकडून काढून टी ॲण्ड टी कंपनीला दिले. या कंपनीने कामाला गती दिली. मात्र, २०१९ साली अतिवृष्टीच्या कामाला फटका बसला. त्यापाठोपाठ २०२० मध्ये कोरोनाचा फटका बसला. अनेक अडचणींवर मात करून या पुलाच्या दोन लेन पूर्णत्वास आल्या आहेत. या कामावर पालकमंत्री एकनाथ शिंदे जातीने लक्ष ठेवून होते. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच या दोन लेन मार्गी लागल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले. दोन लेन खुल्या केल्याने अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलाच्या दोन लेन आणि नव्या पुलाच्या दोन लेन अशा मिळून चार लेन वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.
नालेसफाईची केली पाहणी
कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी आमदार भोईर यांनी केली. यावेळी शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांनी सीएनजी पेट्राेल पंपाजवळ मागच्या पावसाळ्य़ात नाल्यानजीक रस्ता खचला असून, त्याकडे महापालिकेचे प्रशासन लक्ष देत नाही. याठिकाणी वाहने नाल्यात पडून मोठी दुर्घटना होऊ शकते, याकडे लक्ष वेधले आहे. नालेसफाईच्या कामातील त्रुटी कंत्राटदाराच्या लक्षात आणून देण्याकरिता हा पाहणी दौरा असून, नालेसफाई चांगली व्हावी. कुठेही पावसाळ्य़ात पाणी तुंबू नये, अशा सूचना प्रशासनाला केल्या असल्याचे भोईर यांनी सांगितले.
-------------------------------